मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संदर्भात ट्विटरवर आनंद परांजपे यांनी अवमानकारक वक्तव्य केले होते. त्यापार्श्वभूमीवर माजी खासदार आनंद परांजपे यांच्या नावे अन्य 10 प्रकरणात गुन्हे दाखल झाले होते. त्यामुळे त्यांच्यावरील एकूण 11 गुण्यांपैकी एका गुन्हा संदर्भात पोलिसांनी क्लोजर रिपोर्ट न्यायालयात सादर केला. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे व न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण खंडपीठापुढे अन्य 10 प्रकरणाबाबत पुढील दोन आठवडामध्ये अहवाल सादर केला जाईल, अशी माहिती पोलिसांच्या वकिलांनी दिली. त्यानंतर न्यायालयाने या प्रकरणातील तपास सुरू ठेवण्यास सांगितले. परंतु उच्च न्यायालयाचा पुढील आदेश येईपर्यंत पोलीस आनंद परांजपे यांच्यावर आरोप पत्र दाखल करू शकत नाही असे देखील पोलिसांना बजावले.
काय होते नेमके प्रकरण : मुख्यमंत्री, बाळासाहेबांची शिवसेनाचे नेते एकनाथ शिंदे यांच्या विरोधात मानहानीकारक शब्द उच्चारल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे ठाणे शहर अध्यक्ष यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. उल्हासनगरातील बाळासाहेबांच्या शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यांनी केलेल्या तक्रारीवरून येथील मध्यवर्ती व उल्हासनगर अशा दोन पोलीस ठाण्यात आनंद परांजपे यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बाळासाहेबांच्या शिवसेनेचे शहरप्रमुख राजेंद्रसिंह भुल्लर महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली उपशहरप्रमुख जयकुमार केनी यांनी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात आणि विभागप्रमुख प्रमोद पांडे यांनी उल्हासनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून हे गुन्हे करण्यात आले आहेत. ह्या गुन्ह्यातील तपास पोलीस करत होते. त्यामुळे आनंद परांजपे यांच्यावर अटकेची भीती होती.