मुंबई -सिटी सहकारी बँक गैरव्यवहार ( Mumbai City Bank Scam ) प्रकरणात शिवसेनेचे नेते आनंद अडसूळ ( Shivsena Leader Anand Adsul ) यांनी अटकपूर्व जामिनासाठी केलेली याचिका आज मुंबई सत्र न्यायालयाने आज निकाली काढली आहे. आनंद अडसूळ त्यांच्या वकीलांकडून केस पुढे चालवायची नसल्याचे अर्ज आज न्यायालयात दिले असल्याने न्यायालयाने अटकपूर्व जामीनाची अर्ज निकाली काढला आहे. ईडीने आनंद अडसूळ यांच्याविरोधात मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे.
अडसुळांच्या अडचणीत वाढ -
या अगोदरही आनंद अडसूळ यांनी ईडीची कारवाई टाळण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. यावेळी उच्च न्यायालयाने त्यांना कोणतीही सवलत न देता मुंबई सत्र न्यायालयात दाद मागण्याचे सांगितले होते. त्यानुसार अडसूळ यांनी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टात जामिनासाठी अर्ज केला होता. त्या अर्जावर आज कोर्टाने निर्णय देत तात्पुरता जामीन अर्ज फेटाळून लावला होता. आता अडसुळांच्या वकिलांकडून मुंबई सत्र न्यायालयात सुरू असलेल्या अटकपूर्व जामीन अर्ज मागे घेतल्याने आनंदराव अडसूळ यांच्या अडचणीत वाढ झाली असून ईडीकडून केव्हाही अटक होऊ शकते.