मुंबई -निलंबित पोलीस निरीक्षक सचिन वाझेची "बायपास शस्त्रक्रियेमधून बरे होण्यासाठी राहत्या घरी नजरकैद ठेवण्यासाठीची मागणी करणारा विनंती अर्ज फेटाळला एनआयए न्यायालयाने फेटाळला आहे. सचिन वाझे यांना तुरुंगातील रुग्णालयाच्या कक्षात ठेवण्यात येईल, घरगुती जेवणाची परवानगी असेल आणि गरज असेल तेव्हा जेजे रुग्णालयात नेले जावे, अशा सूचनाही न्यायालायने केल्या आहेत.
तळोजा कारागृह रुग्णालयात
मनसुख हिरेन हत्या प्रकरणी अटकेत असलेला निलंबित पोलीस निरीक्षक सचिन वाझेची नुकताच बायपास शस्त्रक्रिया झाली आहे. यामुळे बायपास शस्त्रक्रियेमधून लवकरात लवकर बरे होण्यासाठी राहत्या घरी नजरकैदेत ठेवण्यासाठीचा विनंती अर्ज विशेष न्यायालयात करण्यात आला होता. या याचिकेला राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) विरोध केला असून, तळोजा कारागृहाशी संलग्न रुग्णालये आधुनिक आणि अशा परिस्थिती हाताळण्यास सक्षम असल्याचे म्हटले आहे. सीआरपीसीच्या कलम 309 अंतर्गत सचिन वाझेची न्यायालयीन कोठडी सीआरपीसीच्या कलम 767 मध्ये बदलली जाऊ शकत नाही. एका गंभीर प्रकरणात आरोपीला नजरकैदेत ठेवणे कायदा आणि सुव्यवस्थेच्या नियमांच्या विरोधात आहे. वाझेंची नजरकैदेची याचिका मंजूर झाल्यास ते फरार होऊ शकतात, अशी भीती एनआयएने न्यायालयात व्यक्त केली आहे. यावर बुधवारी (दि. 29 सप्टेंबर) विशेष न्यायालयाने सचिन वाझे यांचा विनंती अर्ज फेटाळून लावला आहे. आता सचिन वाझे याला तळोजा कारागृह रुग्णालयात हलवण्यात येणार आहे.