मुंबई - लॉकडाऊन नंतर प्रथमच होणाऱ्या अठराव्या टाटा मुंबई मॅरेथॉनमध्ये मुंबईकर आपले कौशल्य दाखवण्यासाठी धावत आहेत. 2021 - 2022 मध्ये मुंबई मॅरेथॉनचे आयोजन कोरोनामुळे होऊ शकले नाही. यामुळेच यावेळच्या मॅरेथॉनबद्दल लोकांमध्ये अधिक उत्साह आहे. यावेळी मुंबई मॅरेथॉनसाठी 55 हजारांहून अधिक लोकांनी नोंदणी केली आहे. हाफ मॅरेथॉन वगळता इतर सर्व शर्यती रविवारी मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथून सुरू झाल्या. या स्पर्धेसाठी देशभरातून स्पर्धक दाखल झाले. यात काही दिल्लीतील IT इंजिनियर्सनी देखील सहभाग घेतला.
अनवाणी धावले इंजिनियर्स -दिल्लीतून आलेल्या काही स्पर्धकांपैकी एक म्हणजे आयटी इंजिनियर धर्मेंद्र श्रीवास्तव. आयटी इंजिनिअर म्हटलं की ब्रँडेड कपडे, ब्रॅण्डेड शूज एकूणच त्यांचा थाट असं आपल्या डोळ्यासमोर येतो. मात्र, दिल्लीतून आलेले धर्मेंद्र श्रीवास्तव हे चक्क 21 किलोमीटर स्पर्धेमध्ये अनवाणी धावले. आम्ही त्यांना जेव्हा अनुवाणी धावण्यामागचे कारण विचारलं तेव्हा त्यांनी यामागे अनेक आरोग्यदायी फायदे असल्याचे सांगितले. तसेच अनवाणी धावल्यास आपण आपल्या मातीशी कनेक्ट राहतो, जमिनीशी जोडलेले राहतो. असे देखील धर्मेंद्र श्रीवास्तव यांनी सांगितले.