मुंबई- मुंबईत दरवर्षी आगीच्या घटना घडतात. त्यामधील 80 टक्के इमारतीत सदोष इलेक्ट्रीक वायरिंगचे जाळे पसरल्याचे अग्निशमन दलाच्या तपासणीत समोर आले आहे. मात्र, इमारतीतील सदोष वायरिंगची तपासणी करण्याचे अधिकार नसल्याने अग्निशमन दल आणि महापालिका हतबल असल्याचे समोर आले आहे.
80 टक्के आगी सदोष वायरिंगमुळे
मुंबईत गेल्या काही वर्षांत आगीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. आग लागण्याच्या बहुतेक घटना अनधिकृत वायरिंगमुळे घडत असल्याचे मुंबई अग्निशमन दलाच्या तपासणीत समोर आले आहे. मुंबईत उत्तुंग इमारती, टाॅवर उभारले जात असून व्यवसायिक इमारतींचीही उभारणी झपाट्याने होत आहे. मात्र या इमारती, टाॅवर अथवा व्यवसायिक इमारतींमध्ये वायरिंग करताना कुठलेही नियोजन दिसून येत नाही. तर काही ठिकाणच्या इमारतीत तर अनधिकृत वायरिंगचे जाळे पसरत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कुठल्याही इमारतीत, सोसायटीतील इमारतीत, व्यवसायिक इमारतीत करण्यात येणाऱ्या वायरिंगचे इंडियन इलेक्ट्रीक अॅक्टनुसार दर 5 वर्षांनी ऑडिट होणे गरजेचे आहे. मात्र, अग्निशमन दल व मुंबई महापालिकेकडे हे तपासण्याचे अधिकारच नाही, त्यामुळे मुंबईत गेल्या काही वर्षांत ज्या आगीच्या घटना घडल्या त्यापैकी 80 टक्के आगीच्या घटना सदोष वायरिंगमुळे घडल्याचे मुंबई अग्निशमन दलाचे उपप्रमुख अधिकारी राजेंद्र चौधरी यांनी सांगितले.