मुंबई : मुंबईतील आरोग्य सेवेबाबत सकाळी विधनसभेच्या विशेष कामकाजात आमदार अमिन पटेल यांनी प्रश्न उपस्थित केला होता. या चर्चेत सहभागी होताना आमदार ॲड आशिष शेलार यांनी मुंबईतील आरोग्य सेवेचा उडालेला बोजवारा सभागृहात मांडला. मुंबईसह राज्याच्या ग्रामीण भागातून सुध्दा मुंबईत रुग्ण मोठया प्रमाणात येतात.
या सगळयाचा ताळमेळ दिसून येत नाही. त्यामुळे सरकारने या सगळयाचा एक समग्र आढावा घ्यावा किती रुग्ण मुंबईत येतात, त्यांना असलेली रुग्णालये पुरेशी आहेत का, त्यावर किती खर्च होतो याची श्वेतपत्रीका काढावी, अशी मागणी शेलार यांनी केली. धर्मदाय आयुक्तांच्या अंतर्गत येणारी रुग्णालये आहेत त्यांना सरकारकडून देण्यात येणा-या सुविधा तसेच त्यांच्या कडून मिळणारी सेवा याबाबतचा आढावा घेऊन पडताळणी करावी. ते अटीशर्ती पाळतात का, अशी विचारणाही त्यांनी केली.
मुंबई महापालिका वर्षाला सुमारे ४ हजार कोटी म्हणजे पाच वर्षात २० हजार कोटी रुपये आरोग्यासाठी खर्च करते. साधारणत: ढोबळ अंदाज मांडला तर ४५ हजार मुंबईकरांसाठी हे खर्च होतात. यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार केला जातो. मुंबईकर ज्या पध्दतीने कर देतात त्या पटीने त्यांना सुविधा मिळत नाहीत यामध्ये कुठेही ताळमेळ दिसून येत नाही, महापालिका एकिकडे पाच वर्षाला २० हजार कोटी रुपये खर्च करते आणि रुग्णांना औषधे मिळत नाहीत.