वसई:वसई विरार (Vasai Virar) शहरात शासनाचे सर्व नियम तुडवून अनेक बेकायदा बांधकामे उभी राहिली आहेत. मग त्या चाळ असो किंवा बिल्डिंग... औद्योगिक गाळे असो किंवा हॉटेल्स... पालिकेच्या नाकावर टिचून आणि पैश्याच्या जोरावर अवैध बांधकाम करणे वसई विरार मध्ये सहज शक्य असल्याचे दिसून येत आहे. असेच एक बेकायदा बांधकाम (Illegal construction) करून उभे राहिलेले वसईचे आलिशान 'सुग्नो ईन' हॉटेल सध्या चर्चेत आले आहे. या हॉटेल मालकाने थेट महापालिकेच्या जागेवरच व्यवसायासाठी पाच माळ्याची इमारत बांधल्याने हे हॉटेल सध्या वादात (hotel is currently mired in controversy) सापडले आहे.
पालिका आणि हॉटेल मालकांमध्ये तगडे आर्थिक हित:वसईचे आलिशान 'सुग्नो ईन' पाच माळ्याचे हे हॉटेल चक्क पालिकेच्याच जागेवर बांधन्यात आले आहे. पालिकेच्या नाल्याचा, पालिकेच्या फूट पाथचा वापर करून हे हॉटेल उभे राहिले आहे. या हॉटेलच्या डोक्यावर मोबाईल टॉवर लावण्यात आला आहे. हॉटेलला लागूनच मोठे मोठे जाहिरातींचे बँनर लावण्यात आले आहेत. याशिवाय पालिकेच्या फूटपाथ आणि नाल्याची जागा वापरून हॉटेल मालक धनदांगडे होत चालले आहेत, तरी मात्र त्याचे पालिकेला कोणतेही सोयरे सुतक दिसून येत नाहीत. पालिकेच्या वालीव प्रभागात याबाबत अनेकदा तक्रारी करूनही पालिका हॉटेलकडे ढुंकूनही बघायला तयार नसल्याने पालिका आणि हॉटेल मालकांमध्ये तगडे आर्थिक हित संबंध असल्याचा आरोप तक्रारदार करीत आहे.