मुंबई : दोन्ही आरोपी एटीएम सेंटरमध्ये बँकेचे ग्राहक म्हणून उभे होते. आपल्या जाळ्यात कोणी फसते का हे पाहत होते. संधी साधून ज्येष्ठ नागरिक महिलेला मदतीच्या नावाखाली दोन भामट्यांनी दुसऱ्या एटीएम सेंटरमध्ये नेले. त्यांनी हातचलाखी करुन महिलेला दुसरेच एटीएम कार्ड देऊन पळ काढला. मालाडशिवाय इतर अनेक पोलिस ठाण्यात आरोपींविरुद्ध असे ५ हून अधिक फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत.
फसवणुकीचा गुन्हा दाखल :सेवानिवृत्त महिला शिक्षिकेच्या तक्रारीवरून मालाड पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. मालाड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवी अडाणे यांनी सांगितले की, महिलेने स्टेट बँक ऑफ इंडिया मालाड शाखेतून नवे एटीएम कार्ड मागितले होते. महिलेला एटीएम कार्ड मिळाल्यानंतर ती बँकेत घेऊन गेली. बँक कर्मचाऱ्यांना एटीएम कार्ड ऍक्टिव्ह करण्यास सांगितले. बँकेच्या एटीएम सेंटरमध्ये एटीएम कार्ड अॅक्टिव्हेट करत असताना ते ऍक्टिव्हेट होत नव्हते. याचदरम्यान त्यांच्या मागे उभा असलेल्या ठगाने दुसऱ्या एटीएममध्ये त्यांना नेले. दुसरा ठग टॅक्सी घेऊन बाहेर उभा होताच. याच टॅक्सीतून दुसऱ्या एटीएम सेंटरमध्ये नेऊन एटीएम कार्ड ऍक्टिव्हेट केले. नंतर हातचलाखी करुन भामट्यांनी महिलेला गंडा घालून तिचे एटीएम स्वतःजवळ ठेऊन तिला दुसरेच कार्ड दिले. या सर्व प्रकार एसबीआयच्या एटीएम सेंटरमध्ये घडला. नंतर महिला घरी गेल्यानंतर तिच्या बँक खात्यातून पैसे वजा झाल्याचा मेसेज आला.