मुंबई - विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर ट्विट करून जोरदार टीका केली आहे. फक्त 'ठाकरे' आडनाव असून कोणी 'ठाकरे' होऊ शकत नाही, असे त्या म्हणाल्या आहेत.
देवेंद्र फडणवीस यांनी 14 डिसेंबरला सावरकरांच्या मुद्यावरून राहुल गांधींवर टीका केली होती. त्यावर ट्विटला प्रतिक्रिया देताना अमृता यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
माझे आडनाव गांधी आहे, सावरकर नाही, त्यामुळे मी माफी मागणार नाही, असे राहुल गांधी यांनी दिल्लीत झालेल्या काँग्रेसच्या मेळाव्यात म्हटले होते. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली होती. फक्त गांधी आडनाव असून चालत नाही. त्यांच्यासारखे काम करावे लागते. त्यानुसार काम केले तरच माणसे मोठी होतात, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. या ट्विटवर प्रतिक्रिया देताना अमृता यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली.
ट्विट करून त्या म्हणाल्या, "खरं आहे देवेंद्रजी, फक्त 'ठाकरे' आडनाव असून सुद्धा कोणी 'ठाकरे' होऊ शकत नाही. फक्त आपलं कुटुंब आणि सत्ता या पलिकडे जाऊन लोकांसाठी प्रमाणिकपणे काम करावं लागतं".