मुंबई- महाराष्ट्रात मंदिरे उघडण्यावरून राजकारण चांगलेच पेटले आहे. यात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रानंतर सुरू झालेल्या वादात अमृता फडणवीस यांनी टिप्पणी करत उडी घेतली. शिवसेना नेत्यांनी उत्तर देताच अमृता फडणवीस यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारला 'बुलडोझर सरकार' म्हटले आहे.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांनी राज्यपाल आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वादात ठाकरे सरकारवर टीका करत मंदिरावरून झालेल्या वादात उडी घेतली. अमृता फडणवीस यांनी बुधवारी ट्वीट करून महाराष्ट्रात बार किंवा दारूची दुकाने उघडण्याची मुभा आहे, पण मंदिरे धोकादायक झोनमध्ये आहेत. ज्यांवर भरवसा नसेल अशांना सर्टिफिकेट देऊन स्वतःला सिद्ध करावे लागते. असे लोक स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर (एसओपी) लागू करण्यात सक्षम नसतात. बार आणि दारूची दुकाने सर्रास उघडी आहेत. पण मंदिरे धोकादायक ठरवण्यात आली आहेत. हे सगळं पाहिल्यावर काही लोकांच्या समंजसपणाचे पुरावा म्हणून प्रमाणपत्राची गरज लागते. वाह रे प्रशासन! असे म्हणत अमृता फडणवीस यांनी टीका केली होती. यावर शिवसेना नेत्यांनी अमृता फडणवीस यांच्यावर प्रखर टीका केली होती. त्यावर पुन्हा एकदा ट्विट करत महाविकास आघाडी सरकारवर अमृता यांनी टीका केली आहे.
अमृता फडणवीस यांनी शिवसेना नेत्यांच्या टीकेला ट्विटरद्वारे उत्तर देताना 'मेरे पास ना घर न द्वार, फिर क्या उखाडेगी बुलडोजर सरकार?, असे म्हटले आहे. ठाकरे सरकारला त्यांनी बुलडोझर सरकार म्हणून टोमणा हाणला आहे. त्यावर आता शिवसेना नेत्यांची प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे.