मुंबई -राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचे ड्रग्ज पेडलर जयदीप राणा यांच्याशी घनिष्ठ संबंध असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर अमृता फडणवीस यांनी जाहीर पत्रकार परिषद घेऊन नवाब मलिक आरोप फेटाळून लावले आहेत. संबंधित व्यक्तीशी माझा काही संबंध नाही. फक्त आम्हाला बदनाम करण्याचा हा डाव आहे. मी राजकारणी नाही तर समाजसेवक आहे. माझ्या अंगावर कोणीही आले तर मी सोडणार नाही. बेनकाब नवाब भी होता है और वह जरूर होगा, अशी टीका अमृता फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्यावर केली आहे.
आम्हाला बदनाम करण्याचा डाव -
मलिकांच्या आरोपानंतर अमृता फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत सर्व आरोप फेटाळून लावले. 'रिव्हर मार्च'ची ही संघटना नदी पुनरुज्जीवनाचं काम करते. या संस्थेने त्यावेळी माझ्याशी संपर्क केला होता. त्याला मी सहकार्यसुद्धा केले होते. स्वतः तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घालून दिली होती. याशिवाय अर्थमंत्री सुधारी मुनगंटीवार आणि अनेक अधिकाऱ्यांशी भेट घालून दिली होती. कारण नदी पुनरुज्जीवनाचं महत्वपूर्ण काम ही संस्था करत होती. त्यासाठी त्यांनी उत्कृष्ट मोहीम सुद्धा सुरु केली होती. त्यांच्या प्रचारासाठी मी एक गीतही रेकॉर्ड केलं होते. त्या गाण्याचे रेकॅार्डिंग मुंबईसाठी मोफत स्वरूपात तयार करण्यात आले होते.
या गाण्यात मुंबईचे डब्बेवाले, कोळी बांधव यांचा समावेश होता. गाण्यासाठी कोणतही शुल्क घेण्यात आले नाही. मला अतिशय वाईट वाटल की रिव्हर मार्च या संस्थेचे नाव ड्रग्स संदर्भात जोडले गेले. राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी माझ्यावर लावलेले आरोप तथ्यहीन आहे. संबंधित व्यक्तीशी माझा काही संबंध नाही. फक्त आम्हाला बदनाम करण्याचा हा डाव आहे, असल्याचेही अमृता फडणवीस म्हणाल्या.