मुंबई Amol Kolhe Clarification :अजित पवार गटानं केंद्रीय निवडणूक आयोगाकडे शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातील अन्य खासदारांवर कारवाई करावी, त्यांचं सदस्यत्व रद्द करावं अशी याचिका दाखल केली. (Amol Kolhe) परंतु, यातून अमोल कोल्हे यांचं नाव वगळल्यानं या भेटीला विशेष महत्त्व आलं. खासदार श्रीनिवास पाटील, वंदना चव्हाण यांचं सदस्यत्व रद्द करावं यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटानं याची तक्रार केली आहे; मात्र त्यातून शरद पवार, सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांची नावं वगळली आहेत. अमोल कोल्हे यांचं याचिकेतून नाव वगळल्यानंतर त्यांनी आज (गुरुवारी) अजित पवार यांची मंत्रालयात त्यांच्या दालनात भेट घेतली. या भेटीनंतर चर्चेला उधाण आलं असून अमोल कोल्हे नेमके कोणाच्या गटात हा प्रश्न निर्माण झाला आहे.
मी शरद पवारांसोबतच:या संदर्भात अमोल कोल्हे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी 'ईटीव्ही भारत'ला सांगितलं की, 'शरद पवार सांगतील ते तोरण आणि शरद पवार सांगतील ते धोरण' ही आपली भूमिका आहे. आपण शिरूर मतदारसंघाचे लोकप्रतिनिधित्व करत असून येथील जनतेच्या अनेक प्रश्नांबाबत आपण उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. मतदारसंघातील रस्ते विकास, रेल्वे विकास किंवा पाण्याचा प्रश्न असेल या संदर्भात त्यांच्याशी चर्चा केली आहे.
बिबट्यांचा त्रासापासून सुटका हवी:आपल्या मतदारसंघातील चार विधानसभा मतदारसंघांमध्ये बिबट्याच्या त्रासानं लोक त्रस्त झाले आहेत. त्यांना शेतात ऊसाला पाणी द्यायला जाण्याची भीती वाटते. अशा वेळेस बिबट नियंत्रण कसे करता येईल आणि लोकांना कसा दिलासा देता येईल, याबाबत काय उपाययोजना कराव्यात यासाठी मी संसदेत आवाज उठवणारच आहे; पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही यासंबंधी उपाययोजना करण्याविषयी विनंती केली असल्याचं कोल्हे यांनी सांगितलं.