मुंबई- केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर असून शनिवारी रात्री त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी राजकीय रणनीतीवर सविस्तर चर्चा केली. त्याचबरोबर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांच्यासोबतही बैठक घेऊन मुंबईतील निवडणुकीच्या तयारीचा आढावा सुद्धा घेतला. यानंतर बोलताना अमित शाह यांनी मुंबईत भाजपचा महापौर बसवण्याच्या कामासाठी तयारीला लागा, अशा सूचनाही दिल्या असल्याचे मुंबईचे भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी सांगितले आहे.
मुंबई महापालिका निवडणूक फार प्रतिष्ठेची -केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे शनिवारी सायंकाळी मुंबई येथे आगमन झाले. मुंबईत जोरदार शक्ती प्रदर्शन करत त्यांचे स्वागत करण्यात आले. यानंतर सह्याद्री या अतिथीगृहात अमित शहा यांनी रात्री भाजप नेत्यांच्या बैठकी घेतल्या. सुरुवातीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर अमित शहा यांनी भाजपची कोअर कमिटीची बैठक घेतली.
शाह यांनी बुथनिहाय माहिती घेतली-बैठकीला प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, उपमुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मुंबईतील आमदार, खासदार पुनम महाजन, खासदार गोपाल शेट्टी, खासदार मनोज कोटक, मंत्री मंगल प्रभात लोढा व इतर नेते उपस्थित होते. या बैठकीत अमित शहा यांनी मुंबई निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने आढावा घेतला. मुंबई महानगर पालिका ही निवडणूक फार प्रतिष्ठेची आहे. प्रत्येक बुथबाबत तयारीविषयी अमित शाहांना या बैठकीत माहिती देण्यात आली.