मुंबई -अमित शाह यांच्या स्वागताला मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली विमानतळ ते सह्याद्री अतिथीगृहापर्यंत 15 हजार कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. रविवारी 16 एप्रिल रोजी खारघर येथे ज्येष्ठ निरुपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी अमित शहा यांच्या हस्ते महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. सोबतच ते भाजपच्या विविध नेत्यांसोबत बैठका देखील घेणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
आज सह्याद्री अतिथीगृहात बैठकाएका बाजूला राज्यात महाविकास आघाडी अधिक मजबूत होत आहे. त्यांच्या एकत्रित 'वज्रमुठ' सभा होत आहेत. तर, दुसरीकडे बृहन्मुंबई महानगरपालिकेसह राज्यातील महापालिका निवडणुका केव्हाही जाहीर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा हा दौरा महत्वाचा मनाला जात आहे. मुंबई महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसह आगामी लोकसभा निवडणुकीसाठी अमित शाह मुंबईत रणनीती आखणार आहेत. आज संध्याकाळी सह्याद्री अतिथीगृहावर अमित शहा यांच्या उपस्थितीत राज्यातील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठकही होणार आहे. या बैठकीत विरोधकांच्या भक्कम रणनीतीबाबत प्रत्यक्ष स्थितीचा आढावा घेतल्यानंतर शाह भाजपच्या पदाधिकाऱ्यांना विजयाचा मंत्र देणार असल्याची माहिती भाजपकडून देण्यात आली आहे.
वज्रमुठ भाजपसमोर डोकेदुखी?महाविकास आघाडीत एकीची चिन्हे दिसत आहेत. त्यामुळे भाजपमध्ये चिंतेचे वातावरण असल्याची टीका खासदार संजय राऊत यांनी केली होती. तर दुसरीकडे राहुल गांधीही उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी मातोश्रीवर येणार असल्याच बोलले जात आहे. भाजपविरोधातील महाविकास आघाडीची वज्रमुठ तोडण्याचे काम अमित शाह करू शकतात. मुद्द्यांसह निवडणूक जिंकण्यासाठी अमित शाह भाजप नेत्यांना काही नवीन सूचना देण्याची शक्यता आहे. आगामी विधानसभा, लोकसभा आणि महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने इतर राजकीय पक्षांसोबत मोर्चेबांधणी सुरू केली आहे. अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्याने भाजपला ताकद मिळू शकते.