मुंबई :गृहमंत्रीअमित शाह आपल्या दोन दिवसीय दौऱ्यासाठी शनिवारी (15 एप्रिल) मुंबईत आले आहेत. या दौऱ्यात शाह भाजपच्या विविध नेत्यांच्या बैठका घेऊन राज्यातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचा आढावा घेणार आहेत. आपल्या या दौऱ्यात गृहमंत्री अमित शाह राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर महत्त्वाच्या नेत्यांशी चर्चा करणार आहेत. तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंसोबत सुकाणू समिती सदस्यांची स्वतंत्र बैठकही होणार आहे.
मातोश्रीबाहेर बॅनरबाजी - केंद्रीय मंत्री अमित शहा दोन दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर आले आहेत. त्यांच्या स्वागतासाठी मुंबईभर मोठ्या प्रमाणामध्ये शिंदे - फडणवीस सरकारकडून बॅनरबाजी करण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवास्थानाबाहेरसुद्धा मोठ्या प्रमाणात बॅनर झळकले आहेत. राज्यात झालेल्या नाट्यमय सत्तांतरानंतर अमित शहा यांचा हा चौथा महाराष्ट्र दौरा असून, मुंबईत ते दुसऱ्यांदा येत आहेत. अमित शहा यांचे मोठमोठे होर्डिंग मुंबईभर लावण्यात आले असून त्या होर्डिंग्जवर अमित शहा यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, शिवसेना नेते आनंद दिघे व त्याचबरोबर भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांचे फोटो आहेत.
चंद्रकांत पाटील मात्र दौऱ्यात नाहीत -मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बाबरी मशीद मुद्द्यावरून बाळासाहेब ठाकरे व शिवसेनेवर आरोप केले होते. या त्यांच्या विधानावरुन अमित शाह नाराज असल्याची माहिती मिळत आहे. अमित शाह मुंबईत असताना चंद्रकांत पाटील मात्र कोल्हापुरात असल्याची बातमी आहे.