महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राज्यपाल कोश्यारींनी मुख्यमंत्र्यांना लिहलेल्या पत्रावर अमित शाहांची प्रतिक्रिया, म्हणाले... - भगत सिंग कोश्यारी पत्र

मंदिरे खुली कधी करणार या बाबतची विचारणा राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे केली होती. या पत्रात त्यांनी हिंदुत्त्व आणि धर्मनिरपेक्षतेचा उल्लेख केल्यावरून वाद निर्माण झाला होता. यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

file pic
संग्रहित छायाचित्र

By

Published : Oct 18, 2020, 8:33 AM IST

नवी दिल्ली - महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना नुकतेच लिहलेले पत्र वादग्रस्त ठरले होते. राज्यातील मंदिरे कधी खुली करणार या बाबतची विचारणा राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना केली होती. या पत्रात त्यांनी हिंदुत्त्व आणि धर्मनिरपेक्षतेचा उल्लेख केला होता. या पत्रावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आता प्रतिक्रिया दिली आहे.

'राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आपल्या शब्दांचा अधिक चांगल्या प्रकारे वापर करू शकले असते. मी ते पत्र वाचले असून त्यांनी काही विशेष शब्द टाळायला हवे होते', असे अमित शाह एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले.

काय आहे प्रकरण ?

राज्यातील मंदिरे खुली करण्याबाबत राज्यपाल कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहले होते. त्यात राज्यपालांनी हिंदुत्व आणि धर्मनिरपेक्षतेवर वादग्रस्त वक्तव्य केले होते.

'तुम्ही धर्मनिरपेक्ष झाला आहात का? सरकारने बार, रेस्टॉरंट खुली केली असून मंदिरे आणि तीर्थक्षेत्रे अद्याप बंद ठेवली आहेत. हा विरोधाभास आहे. तुम्ही(मुख्यमंत्री) स्वत: हिंदुत्ववादी आहात. तुम्हाला धर्मनिरपेक्षतेचा तिरस्कार वाटतो. मात्र, आता तुम्हीच धर्मनिरपेक्ष झालात का', असा प्रश्न त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना विचारला होता.

या पत्रावरून राज्यात मोठा वाद निर्माण झाला होता. घटनात्मक पदावर बसलेल्या व्यक्तीने धर्मनिरपेक्षतेवर असे वक्तव्य करणे योग्य नाही, असा सुर उमटला होता. या पत्राला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिलेले उत्तरही चांगलेच गाजले होते. माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची गरज नसल्याचे उत्तर मुख्यमंत्र्यांनी पत्राद्वारे दिले होते. राष्ट्रवादी पक्षाचे नेते शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून चिंता व्यक्त केली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details