मुंबई -ईशान्य मुंबईतील लोकसभेच्या जागेचा तिढा अद्याप सुटलेला नाही. किरीट सोमय्या यांच्या नावाचे गुऱ्हाळ अद्याप सुरूच आहे. मात्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजपचे अध्यक्ष अमित शाह हा तिढा सोडवतील, असे भाजप नेते तथा मंत्री विनोद तावडे यांनी स्पष्ट केले आहे.
किरीट सोमय्या यांच्या उमेदवारीचे गुऱ्हाळ सुरूच; उद्धव ठाकरे-अमित शाह घेणार निर्णय - bjp
ईशान्य मुंबईत भाजपचे विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांना उमेदवारी देऊ नये, अशी मागणी शिवसेनेने लावून धरली आहे.
ईशान्य मुंबईत भाजपचे विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांना उमेदवारी देऊ नये, अशी मागणी शिवसेनेने लावून धरली आहे. तसेच या लोकसभा मतदार संघात भांडूप विधानसभेचे शिवसेनेचे आमदार सुनील राऊत यांनी सोमय्या यांना उमेदवारी दिल्यास ईशान्य मुंबईतून सोमय्या यांच्या विरोधात लढणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे हा तिढा अधिकच वाढला असून यासंदर्भात आज (शुक्रवार) दुपारी वर्षा निवासस्थानी आमदार प्रसाद लाड, किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मात्र यासंबंधी कोणताही निर्णय झाला नाही.
उद्या अमित शाह गांधीनगरमधून लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यावेळी उद्धव ठाकरेही उपस्थित राहणार आहेत. या दोन्ही वरिष्ठ नेत्यांच्या चर्चेनंतर ईशान्य मुंबईचा तिढा सुटेल, अशी शक्यताही तावडे यांनी वर्तवली आहे.