मुंबई - मुंबई क्राईम ब्रँचने 3 जणांना अटक केली आहे. या तीन जणांकडून एम्बरग्रिस जप्त करण्यात आले आहे. या एम्बरग्रिसला उमेट गोल्ड असेही म्हणतात. या एम्बरग्रीसची बाजारात कोट्यावधीची किंमत आहे. तब्बल एक कोटी रुपयांना एक किलो एम्बरग्रिस विकले जाते, अशी माहिती आहे. दरम्यान पोलिसांनी या तिघांकडून तब्बल (2.7) किलो एम्बग्रीस जप्त केले आहे. या एम्बरग्रीसची विदेशात मोठ्या प्रमाणात मागणी आहे. सुगंधी द्रव्य करण्यासाठी याचा वापर केला जातो. विशेषतः ऑस्ट्रेलिया आणि ब्रिटनसारख्या देशातून याला मोठी मागणी असते.
'टीममध्ये बायोलॉजिस्ट यांचाही समावेश'
काही लोक मुंबईला वेल माशाची उलटी विकण्यासाठी येत आहेत, अशी गुप्त माहिती आम्हाला मिळाली होती. त्यानंतर सापळा रचत, आम्ही ही कारवाई केली. या टीममध्ये मरिन बायोलॉजिस्ट यांचाही समावेश होता. या कारवाईत तीन लोकांना पकडले आहे अशी माहिती क्राईम ब्रँचचे डीसीपी प्रकाश जाधव यांनी दिली आहे. ताब्यात घेतलेल्या व्यक्तींकडे एक थैली होती, ज्यामध्ये ब्राऊन रंगाचा एक पदार्थ आढळला. मरीन बायोलॉजिस्ट यांच्या मदतीने या पदार्थाची तपासणी करण्यात आली. दरम्यान, हा पदार्थ व्हेल माशाची उलटी असल्याचे निष्पन्न झाले. तसेच, या पदार्थाला ओमेट गोल्ड असेही म्हणतात. ताब्यात घेतलेल्या पदार्थाचे वजन (2.7) किलोग्राम इतके आहे. तसेच, त्याचे बाजार भाव (2) करोड 70 लाख इतका आहे. रमेश वगेला, अरविंद शाह आणि धनाजी ठाकुर अशी अटक करण्यात आलेल्या व्यक्तींची नावे आहेत.