मुंबई: बुलढाणाच्या सिंदखेडराजा येथे बारावीच्या गणिताचा पेपर फुटल्याने संपूर्ण राज्यभर त्याचे पडसाद उमटायला सुरुवात झाले. आहेत. अर्थसंकल्पीय अधिवेशनातही पेपर फुटीच्या मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी थेट सरकारवरच आरोप केला आहे.
गणिताचा पेपर फुटला कसा?:विरोधी पक्षनेते अंबादास दानवे पुढे म्हणाले की, राज्यातील दहावी बारावीच्या परीक्षा सुरळीत व्हाव्यात. कॉपीबहादरांवर पूर्णपणे आळा बसावा यासाठी राज्य सरकारने पूर्णपणे तयारी केली असल्याचे सांगितले होते. सुरक्षित वातावरणात विद्यार्थ्यांना पेपर देता यावा, यासाठी शिक्षण विभागाने तयारी केल्यास म्हटले. मात्र तरीही गणिताचा पेपर फुटला आहे. हे कसं शक्य झालं? सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्येकाच्या फोनवर बारावीचा गणिताचा पेपर पोहोचला, हा धक्कादायक प्रकार असल्याचे ते म्हणाले.
राज्य सरकारवर आरोप: गणिताचा पेपर फुटत असताना शिक्षण विभागातील अधिकारी काय करत होते? परीक्षा सुरक्षित आणि चांगल्या वातावरणात व्हाव्यात यासाठी सरकारने पूर्ण यंत्रणा कामाला लावली, असे म्हटले जात असतानाही पेपर कसा फुटला. यामागे सरकारच आहे का? असा गंभीर आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्य सरकारवर केला आहे. या सर्व प्रकरणाची चौकशी तातडीने करण्यात यावी, अशी मागणी विरुद्ध पक्षनेते अंबादास दानवे यांनी सभागृहात केली आहे. तसेच राज्य सरकारने परिक्षेसंबंधित केलेले सर्व दावे फोल ठरले असल्याचा टोलाही अंबादास दानवे यांनी राज्य सरकारला लगावला आहे.