मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर असताना त्यांच्याकडे आपल्याला पदमुक्त करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतरच राज्यामध्ये राज्यपाल बदलाचे वारे वाहू लागले आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महापुरुषांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर महाविकास आघाडी चांगलीच आक्रमक झाली होती. हिवाळी अधिवेशनातही राज्यपालांविरोधात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आंदोलने केली. त्यानंतर राज्यपाल बदलले जातील अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती.
अमरिंदर सिंग यांची प्रतिक्रिया - माझ्याशी कोणीही संपर्क साधला नाही. मला याबद्दल काहीच माहिती नाही. कोणीही काहीही नमूद केलेले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी जी जबाबदारी देतील ती मी पार पाडायला तयार आहे, अशी प्रतिक्रिया भाजप नेते आणि पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी दिली. महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाच्या चर्चांवर त्यांनी प्रतिक्रिया दिली.
अमरिंदर सिंग नवे राज्यपाल? :कोश्यारी यांनी परत जाण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांना महाराष्ट्राचे नवे राज्यपाल बनवले जाण्याची चर्चा आहे. कॅप्टन अमरिंदर सिंग हे पंजाबचे जवळपास नऊ वर्ष मुख्यमंत्री राहिले आहेत. त्यांनी पंजाब विधानसभा विधानसभा निवडणुकीसाठी स्वतःचा पक्ष स्थापन केला होता.
भाजपशी युती :अमरिंदर सिंग त्यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाची युती केली होती. मात्र या निवडणुकांमध्ये त्यांना अपयश आले होते. काँग्रेसला सोडचिट्टी दिल्यानंतर अमरिंदर सिंग हे भारतीय जनता पक्षात जातील अशा चर्चादेखील त्यावेळी रंगल्या होत्या. मात्र अमरिंदर सिंग यांनी आपला स्वतःचा पक्ष काढून विधानसभा निवडणूक लढवली. मात्र, या निवडणुकीत त्यांना यश आले नाही. त्यानंतर त्यांनी आपला पक्ष भारतीय जनता पक्षात विलीन करून टाकला होता.