मुंबई :महाराष्ट्राचा ‘पॉवर हाऊस’ अभिनेता सिद्धार्थ जाधव (Siddhart Jadhav) त्याच्या विनोदी भूमिकांसाठी ओळखला जात असला तरी तो इतर जॉनरच्या भूमिका देखील तितक्याच ताकदीने करतो. ‘बालभारती’ हा चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर असून, चित्रपटाच्या प्रोमोशन दरम्यान आमचे प्रतिनिधी कीर्तीकुमार कदम यांच्यासोबत बातचीत करताना सिद्धार्थ जाधव म्हणतो की,... मी एक अभिनेता आहे. मला भलेही विनोदी अभिनेता म्हणून ओळखले जात असेल, पण कलाकार म्हणून मी कुठलीही भूमिका करण्यास सक्षम आहे. मला ‘विनोदी’ चौकटीत जरी बसविले असले तरी मी त्याला फ्रेम समजतो. थोडक्यात गोष्टींकडे तुम्ही कोणत्या नजरेने बघता हे महत्वाचे.
बालभारतीसारखा सिरीयस चित्रपट करण्याचे कारण काय?पहिलं म्हणजे ‘बालभारती’ हा सिरीयस चित्रपट नाही. मान्य आहे तो निखळ विनोदी चित्रपटही नाही. परंतु यात कॉमेडी नक्कीच आहे, शिक्षण या विषयावरील महत्वाचा संदेश असलेला आणि अत्यंत मनोरंजक आहे असा चित्रपट आहे. यात शंका नाही. असं सिद्धार्थ जाधव सांगतो.
मी जास्त करून विनोदी सिनेमे केले हे मान्य आहे. परंतु मी वेगळ्या प्रकारच्या भूमिकाही केल्या आहेत. मी शिवाजीराजे बोलतोयमध्ये मी खतरनाक सुपारी-गुंड केला होता. ड्रीम मॉल मध्ये मी बलात्कारी इसमाची भूमिका केली होती. लालबाग परळ, शिक्षणाच्या आयचा घो सारख्या चित्रपटांत माझा रोल वेगळा होता. मी पारध नावाचा चित्रपट केला त्यातही माझी निराळी भूमिका होती. धुराळामध्ये मी अत्यंत संयत व्यक्ती साकारली आहे. याही भूमिकांना प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. महेश मांजरेकरांनी मला नेहमीच कॉन्फिडन्स दिला आहे. मी एक नट आहे आणि मला सर्व प्रकारच्या भूमिका करायला आवडतात. मला नेहमी वेगळे कथानक, वेगळी भूमिका, वेगळा चित्रपट, वेगळा जॉनर हवे असतात.
‘बालभारती’ हा चित्रपट तुझ्याकडे कसा आला?या प्रश्नाला उत्तर देताना सिद्धार्थ म्हणतो की,२०१९ मध्ये मला नितीनचा फोन आला की माझ्याकडे एक विषय आहे आणि त्यासाठी तीन-तीन निर्माते तयार आहेत. आम्ही दादरला कॉफी शॉपमध्ये भेटलो आणि पहिल्या रिडींगमधेच मी चित्रपटासाठी हो म्हटलं. खरंतर प्रेक्षक म्हणून मी त्याचा फॅन आहे. त्याची लहान मुलांना घेऊन चित्रपट करण्याची हातोटी वाखाणण्याजोगी आहे. मी त्याचा झिंग चीक झिंग बघितला होता. त्यात त्याने शेतकरी आत्महत्या विषयाला हात घातला होता आणि लहान मुले आपल्या शेतकरी असलेल्या वडिलांना आत्महत्या करण्यापासून कसे परावृत्त करतात हे अत्यंत भावनिक पद्धतीने चितारले होते. हा दिग्दर्शक मुलांमध्ये ‘हिरो’ पाहतो. मला एक वेगळा, आजच्या काळातील तरुण, बाप साकारायला मिळाला त्याबद्दल ही त्याचा ऋणी आहे.