मुंबई:आयआयटी मुंबईच्या माजी विद्यार्थ्यांनी आयआयटी मुंबईकरिता सुमारे एक अब्ज पाचशे कोटीपेक्षा अधिक रुपयांची देणगी देऊन परतफेड करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ही देणगी शाश्वत हरित ऊर्जा यासाठी तसेच हवामान बदलावर उपाययोजना शोधण्यासाठी याचा वापर केला जाणार आहे.
सहा दशकात 70 हजार संशोधक:जगभर हवामान बदलामुळे सर्व राष्ट्र चिंतेत आहे. त्याबाबत प्रत्येक देश आपल्या परीने हवामान बदलावर काम करत आहे. हवेमध्ये प्रचंड प्रमाणात कार्बन डाय-ऑक्साइड सोडला जातो आणि त्याच्यामुळे मानव जातीला मोठा धोका निर्माण झाला आहे. त्याचं कारण ओझोन वायू सह पृथ्वीवरील वातावरणामध्ये विनाशकारी बदल होत असल्याचं जगातील शास्त्रज्ञांनी अहवालाद्वारे व्यक्त देखील केलाय. म्हणूनच आयआयटी मुंबई कडून हवामान बदल आणि त्याचे कृषी क्षेत्रावर मानव जातीवर होणारे पर्यावरणीय परिणाम याबाबत अभ्यास या देणगीच्या माध्यमातून केला जाणार आहे. आयआयटी मुंबईने सहा दशकात 70,000 अभियंते संशोधक आणि शास्त्रज्ञ दिलेले आहेत. या संस्थेत 715 प्राध्यापक कार्यरत आहेत. पहिल्या पंतप्रधानांनी विज्ञानाची मुहूर्तमेढ रोवली आणि आज त्याचा वटवृक्ष झालेला आहे. त्या माजी विद्यार्थ्यांनीच भली मोठी देणगी देऊन भारताच्या विकासासाठी योगदान दिलेले आहे.
भारत मागे राहता कामा नये:जगातील अनेक देश आता हरित ऊर्जेमध्ये संशोधन आणि विकास यांच्या मागे लागलेले आहे. भारत देखील यामध्ये मागे राहता कामा नये. म्हणून भारताकडे उपलब्ध असलेली साधनसामग्री आणि जैवविविधता तिला टिकवणे, तिचा विकास करणे यासाठी आयआयटी मुंबईमध्ये हरित ऊर्जा आणि शाश्वत ऊर्जेचे संवर्धन करण्यासाठी हे विशेष संशोधन केले जाणार आहे. यासाठी खास केंद्र देखील उभारले जाणार आहे.