मुंबई - राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप लावत नोटबंदी निर्णयानंतर मुंबईत सापडलेल्या 14 कोटी 56 लाख रुपयाच्या नोटांचे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. तसेच मुख्यमंत्री असताना अंडरवर्ल्डसोबत देवेंद्र फडणवीस यांचे संबंध होते, असे गंभीर आरोप लावले आहेत. तसेच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मंत्री नवाब मलिक यांनी दोन गुन्हेगारांकडून जमीन खरेदी केली असल्याचा गंभीर आरोप केला आहे. याबाबत दोन्ही बाजूने पुरावे समोर आणले जात आहे. मात्र, या सर्व आरोप-प्रत्यारोपामध्ये महाराष्ट्र राज्याची नाहक बदनामी होत आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
दोन्ही नेत्यांकडून एकमेकांवर केले जाणारे आरोप हे गंभीर आहेत. या सर्व प्रकरणापासून काँग्रेसला अलिप्त राहून चालणार नाही. महाराष्ट्राची संपूर्णपणे जडणघडण काँग्रेसने केला आहे. अशा महाराष्ट्राची जर बदनामी होत असेल तर यावर चौकशी करण्याची मागणी नाना पटोले यांच्याकडून करण्यात आली. मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
14 नोव्हेंबर ते 19 नोव्हेंबर सप्ताह -
पेट्रोल-डिझेल दरवाढ, महागाई, शेतकरी आणि कामगारांच्या प्रश्नांवर केंद्र सरकारच्या विरोधात 14 नोव्हेंबर ते 19 नोव्हेंबर सप्ताह साजरा करण्यात येणार, असे नाना पटोंलेंनी सांगितले. तसेच एक दिवसाचे जेल भरो आंदोलनही करणार असल्याचे त्यांनी सांगितले. आठडाभर मंत्री गावात राहणार आहेत. यादरम्यान, केंद्र सरकारने सामान्य नागरिकांना आर्थिक कमजोर कसे केले याची माहिती आम्ही सांगणार आहोत. पदयात्रा काढण्यात येईल. मंत्री, आमदार तळागळातील नागरिकांमध्ये राहणार आहेत. त्यांना माहिती देणार आहेत. 14 नोव्हेंबरला सेवाग्राम येथे जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यादरम्यान, आंदोलन शांततेत पार पाडले जाईल. केंद्रसरकार विरोधात हे आंदोलन असेल. अरुणाचलमध्ये चीनने वास्तव्य सुरू केले. मात्र, केंद्र सरकार सांगायला तयार नाही, अशी टीकाही त्यांनी केली.
हेही वाचा -सहकार्य करा, राजकीय पोळ्या भाजू नका; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे आवाहन
एसटी कर्मचाऱ्यांच्या मागणीचा सहानुभूतीने विचार व्हावा -
एसटी महामंडळाच्या विलीनीकरण आवरून एसटी कर्मचारी संपावर आहे. तिथेच हा संप न्यायालयाने अवैध ठरवला असून राज्य सरकारकडून जवळपास साडेतीनशेच्यावर एसटी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. मात्र, एसटी कर्मचाऱ्यांच्या मागणीकडे राज्य सरकारने सहानुभूतीपूर्वक पहावे अशी विनंती नाना पटोले यांनी केली आहे. भाजपचे पाच वर्षे सरकार होते. मग एसटी कर्मचाऱ्यांना न्याय का नाही दिला, असा सवालही त्यांनी यावेळी केला. आम्ही दिवाळीमध्ये प्रवाशांना त्रास होऊ नये म्हणून संप करू नका, ही काँग्रेसची भूमिका होती. ऊर्जा विभागाने सुरू केलेली चौकशी ही सूड बुध्दीने केली जात नाही. यामध्ये घोटाळा झाला असेल तर नक्की समोर येईल. ऑडिट केले जात आहे हे नियमानुसार केले जात आहे. जलयुक्त शिवार योजनेची चौकशी ही अशीच झाली होती. काहींनी यामध्ये क्लिन चिट मिळाल्याचे सांगितले पण अजूनही चौकशी सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले. गोपीचंद पडळकर यांनी केलेले आंदोलन म्हणजे आपली राजकीय पोळी भाजण्याचे काम आहे. या आधी ही एमपीएससीच्या परीक्षेबाबत गोपीचंद पडळकर यांनी आंदोलन करून त्या विद्यार्थ्यांचे नुकसान केले होते. याची आठवण नाना पटोले यांनी करून दिली. केंद्र सरकारने 5 रुपये पेट्रोल 10 रुपये डिझेल कमी केले म्हणजे उपकार केले नाहीत, असा टोलाही त्यांनी लगावला.