मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस म्हणजे 'लूट की दुकान, झूठ का बाजार' असा घणाघात केला. पंतप्रधानांना खरे तर स्वपक्षाविषयी बोलायचे होते; पण चुकून तोंडातून काँग्रेसचे नाव निघाले. काँग्रेस किंवा अन्य राजकीय पक्ष 'लूट की दुकान' आहे. लुटीचा माल विकत घेऊन भाजप आपले घर का भरत आहे? असा सवाल सामनातून पंतप्रधान मोदी यांना विचारला असून त्यावर खुलासा करावा, असे अग्रलेखात नमूद केले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीकास्त्र सोडले आहे. भाजप आता राष्ट्रीय चोर बाजार बनला आहे. लुटीचा आणि चोरीचा माल विकत घेणारा पक्ष म्हणून बदनाम होतो आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस मोदींचीच थुंकी झेलून 'मी पुन्हा येईन', असा दावा करतात. येताना दोघांना घेऊन आलो. हे दोघे म्हणजे शिंदे-अजित पवार. दोघांवर अमाप भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. म्हणजे येताना भ्रष्टाचाराचा व लुटीचा माल घेऊन आलो, असे फडणवीस यांना म्हणायचे आहे का?, असा सवाल देखील शिवसेनेने अग्रलेखातून उपस्थित केला आहे.
भ्रष्टाचाराचा आरोप असलेले भाजपचे मित्र :आठवड्यापूर्वी पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सगळ्यात भ्रष्ट असल्याचा आरोप केला. आज त्याच राष्ट्रवादी पक्षाला मोदींनी मांडीवर घेतले आहे. मोदी आता तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्यावर आरोप करत आहेत. निवडणुकीच्या तोंडावर आरोप सुरू आहेत. केसीआर सरकार म्हणजे सर्वांत भ्रष्ट सरकार असा मोदींचा आरोप आहे. आम्हाला आता केसीआर पक्षाची भीती वाटतेय. कारण, मोदी ज्या पक्षाला भ्रष्ट मानतात तो पक्ष पुढच्या काही काळात भाजपचा मित्र बनून सत्तेत सहभागी होतो किंवा त्या भ्रष्ट पक्षात फूट पाडून त्यातला सगळ्यात भ्रष्ट गट भाजपवासी केला जातो. भाजपचा हाच राजकीय शिष्टाचार बनल्याचा घणाघात अग्रलेखातून केला आहे.
भाजपशासित प्रदेशात दलितांवर अत्याचार :भाजपचे लोक मध्य प्रदेशात दलितांवर अत्याचार करीत आहेत. मस्तवाल पदाधिकारी एका दलितावर उघडपणे लघुशंका करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. देशाची जगभरात यामुळे छी-थू झाली. पंतप्रधान मोदींनी यावर एक शब्दही बोललेला नाही. भोपाळमध्येसुध्दा दलित तरुणाला भाजपच्या कार्यकर्त्याने स्वतःचे तळवे चाटायला लावले होते. हे देखील भयंकर प्रकरण आहे. प. बंगालातील ग्रामपंचायत निवडणुकात हिंसाचार झाला व त्यात 11 जण ठार झाले. मणिपुरात भाजपचे सरकार असून तेथील हिंसाचार दोन महिन्यांपासून थांबायचे नाव घेत नाही. दोनशेच्या आसपास लोक त्या राज्यात हिंसाचारात मरण पावले. मणिपूरच्या हिंसेवर पंतप्रधानांनी तोंड उघडले नाही. काय म्हणावे याला? पंतप्रधान मोदींच्या काळात खलिस्तानी चळवळीने पुन्हा डोके वर काढल्याची सकडून टीका सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आली.