महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबईची बत्तीगुल : लोकल ठप्प, कार्यालयात अंधार, पाणीपुरवठा खंडित... - मुंबई पॉवर कट

मुंबईतील कोट्यवधी लोकांची दैनंदिन कामे वीजेवर अवलंबून आहेत. मात्र, याच विजेमुळे आज कधीही न थांबणारी मुंबई अचानक झालेल्या पॉवर कटमुळे काही काळ ठप्प झाली. याचा काय परिणाम झाला याबाबत घेतलेला हा आढावा...

Mumbai Power Cut
मुंबई वीज पुरवठा

By

Published : Oct 12, 2020, 7:44 PM IST

मुंबई - देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई शहराला वीजपुरवठा करणाऱ्या पॉवर ग्रीडमध्ये बिघाड झाल्यामुळे सुमारे तीन तास मुंबईत ''बत्तीगुल'' झाली. याचा थेट परिणाम शहरातील जनजीवनावर झाला. कधीही न थांबणारी मुंबई काहीकाळ थांबली. काही भागांमधील लोकल सेवा बंद पडल्या, पाणी पुरवठा खंडित झाला, कार्यालयांमध्ये अंधार पसरला, कोरोनामुळे वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांना याचा फटका बसला, ऑनलाईन परीक्षा पुढे ढकलावी लागली, सुदैवाने चोख नियोजन असल्याने कोविड सेंटर्सना याचा फटका बसला नाही. दरम्यान, या प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टेक्निकल ऑडिटचे आदेश दिले आहेत. दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असे सांगितले आहे.

ठप्प झालेली रेल्वे सेवा सुरळीत करण्यात यश -

मुंबईची लाईफलाईन समजली जाणारी लोकल रेल्वे सेवा काही काळासाठी ठप्प झाली होती. दररोज सकाळी लाखो मुंबईकर रेल्वेचा वापर करून आपल्या कामावर जातात. आज वसई ते चर्चगेट दरम्यानची रेल्वेसेवा पूर्णपणे ठप्प झाली होती. त्यामुळे रेल्वे स्थानकावर प्रवाशांची गर्दी जमा झाली होती. मात्र, मध्य व पश्‍चिम रेल्वे प्रशासनाकडून युद्धपातळीवर काम हाती घेण्यात आले. त्यामुळे काही तासातच हार्बर मार्गावरील पनवेल तेच सीएसएमटी दरम्यान लोकल सेवा सुरळीत करण्यात आली. त्यानंतर टप्प्याटप्प्याने पश्चिम मार्ग, मध्य मार्गावर लोकलसेवा नागरिकांना बहाल करण्यात आली.

अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांचे वेळापत्रक बिघडले -

सध्या लोकल रेल्वेत अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना प्रवास करण्याची मुभा देण्यात आलेली आहे. सकाळी मुंबईची बत्ती गुल झाल्यानंतर याचा फटका अत्यावश्यक सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना बसला. काही ठिकाणी रेल्वे मध्येच बंद पडल्याने प्रवासीही अडकून पडले होते. दोन तासांनी रेल्वेसेवा सुरळीत झाल्यानंतर दुपारी कर्मचारी कार्यालयांमध्ये पोहचले. त्यामुळे साहजिकच त्यांचे दिवसाचे कामाचे नियोजन बिघडले. मुंबई शहरात असलेली सरकारी कार्यालये, कॉर्पोरेट ऑफिसेस, मुंबईच्या रस्त्यांवर ट्रॅफिक मॅनेज करण्यासाठी लावण्यात आलेले सिग्नल व शहरात सुरक्षेच्या दृष्टिकोणातून बसवण्यात आलेले 5 हजार 500 सीसीटीव्ही कॅमेरेसुद्धा यामुळे बाधित झाले होते. मात्र, युद्धपातळीवर वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे काम हाती घेण्यात आल्यानंतर काही तासातच या सर्व सेवा पुन्हा काम करू लागल्या.

पाणीपुरवठा काही काळ खंडीत मात्र, पुन्हा सुरू -

पाणी पुरवठा करण्यासाठी वीज हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. आज मुंबईसह ठाणे, पालघरयेथील वीज पुरवठा विस्कळीत झाल्याने पाणी पुरवठ्यावर परिणाम झाला. शहरात अनेक ठिकाणी पाणी पुरवठा पूर्णपणे खंडीत झाला तर काही ठिकाणी कमी दाबाने पुरवठा करण्यात आला. पडघा येथील महाराष्ट्र राज्य विद्युत विकास महामंडळातर्फे (MSEDCL) होणारा विद्युत पुरवठा खंडीत झाल्याने टेमघर येथील ठाणे मनपाचे आणि स्टेम प्राधिकरणाचे पूर्ण पंपिंग बंद झाले होते. काही काळाने विद्युत पुरवठा सुरू झाला. त्यानंतर तत्काळ पिसे आणि टेमघर येथील पंपिंग सुरू करण्यात आले आहे.

वीजेअभावी शेकडो कोटींचे आर्थिक नुकसान?

मुंबईत वीज गेल्याने एका तासात 258 कोटींचे नुकसान होत असल्याचे तज्ञांचे अनुमान आहे. त्याचा थेट परिणाम देशातील 25 टक्के औद्योगिक उत्पादनावर पडतो. देशातील 70 टक्के समुद्री व्यापार मुंबईतून होतो. मुंबईत मोठ्या प्रमाणात बँकांपासून अन्य सरकारी कार्यालयांची मुख्यालये आहेत. याचा प्रभाव देशभरातील 70 टक्के व्यवहारांवर पडतो. कोरोना महामारीमुळे लागू केलेल्या लॉकडाऊनपासून देशभरातील आर्थिक व्यवहारांना खीळ बसली. मुंबईत मोठ्या प्रमाणात कामगार माघारी गेले. कर्मचारी वर्क फ्रॉम होम करत आहेत. तसेच काही ठिकाणी कार्यालये सुरू झाल्यानंतर लोकलने फक्त अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्यांना परवानगी देण्यात आलीय. अशातच मुंबई पूर्वपदावर येत असताना अचानक वीजपुरवठा खंडित झाल्याने आर्थिक राजधानीला झळ सोसावी लागली.


वर्क्र फ्रॉम होम करणाऱ्यांना बसावे लागले हात धरून -

'पॉवर ग्रीड फेल्युअर'मुळे आज सकाळपासून मुंबईत सर्वत्र वीजपुरवठा खंडित झाला. याचा फटका वर्क फ्रॉम होम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही बसला. राज्यातील सर्वात जास्त मल्टिनॅशनल कंपन्या मुंबईमध्ये आहेत. मोठ्या प्रमाणात आयटी क्षेत्राचा विकासही मुंबईसह उपनगरात झाला आहे. सध्या यातील 90 टक्के कर्मचारी वर्ग कोरोनामुळे घरातून काम करत आहे. अशा वेळी डेटाबेस प्रोव्हायडर्स व त्यावर काम करणाऱया कर्मचाऱ्यांना वीज नसल्याचा फटका बसला.

ऑनलाइन परीक्षा अडकली -

मुंबई विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या ठाणे आणि नवी मुंबई परिसरातील महाविद्यालयांमध्ये अंतिम वर्षाच्या ऑनलाइन परीक्षा सुरू आहेत. आज सकाळच्या सत्रातील पेपर सकाळी दहा वाजता सुरू झाले. मात्र, बरोबर पंधरा मिनिटांच्या अंतराने या परिसरात वीज गायब झाल्याने असंख्य विद्यार्थ्यांना डाऊनलोड झालेले पेपर सोडवता आले नाहीत. सुरुवातीला वीज जाण्याचे नेमके कारण माहित नसल्याने मुंबईतील बहुतांश महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना अर्ध्या तासाची सूट दिली. मात्र, वीज येत नसल्याचे लक्षात आल्याने आजच्या सकाळच्या सत्रातील पेपर पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे विद्यार्थी आणि महाविद्यालयांचा वेळ आणि परिश्रम दोन्ही वाया गेले.

चोख उपाययोजनांमुळे 'रुग्णसेवा' बचावली -

आज वीज पुरवठा बंद होऊन मुंबईची 'बत्ती गुल' झाल्याने अनेक व्यवहार ठप्प झाले. रेल्वे सेवा बंद पडली. यादरम्यान मुंबईतील रुग्णालय सेवा बंद पडेल अशी भीती होती. मात्र, असा कोणताही प्रकार घडलेला नाही. विद्युत पुरवठा खंडित होण्याचा प्रकार कधीतरीच होतो. तरीही बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सर्वच रुग्णालयांमध्ये नेहमीच पर्यायी व्यवस्था उपलब्ध असते. सर्व रुग्णालयांमध्ये डिझेलवर चालणारी स्वयंचलित जनित्रे सुसज्ज असतात. त्यामुळे विद्युत पुरवठा खंडित झाल्यानंतर लगेचच सर्व जनित्रे पद्धतीने तत्काळ सुरू झाले, अशी माहिती प्रशासन आणि राज्याच्या आरोग्य मंत्र्यांनी दिली.

मुख्यमंत्र्यांनी दिले टेक्निकल ऑडिटचे आदेश -

मुंबई महानगर क्षेत्रातील वीज खंडित झाल्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली. तातडीने या घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले. ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्याशी देखील त्यांनी चर्चा केली. मुंबई तसेच मुंबई महानगर क्षेत्रातील वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने सर्वतोपरी प्रयत्न करावेत, अशा सूचना दिल्या. भविष्यात परत अशी घटना घडू नये, यासाठी सतर्कता बाळगावी, असेही त्यांनी सांगितले आहे. यासंदर्भात त्यांनी सायंकाळी एक उच्चस्तरिय बैठक घेतली. या घटनेला जबाबदार असलेल्या लोकांवर कडक कारवाई केली जाईल, असेही त्यांनी या बैठकीत सांगितले.

मुंबईची वीजेची भूक वाढतेय -

मुंबई शहर आणि उपनगरांना टाटा पॉवर आणि अदानी या कंपन्या वीज पुरवठा करतात. या दोन्ही कंपन्याचे प्लँट मुख्य शहरापासून दूर आहेत. आज सकाळी कळवा-पडघा जीआयएस केंद्रात सर्किट-1ची दुरुस्ती सुरू होती. त्यामुळे वीज पुरवठ्याचा सर्व भार सर्किट-2 वर होता. परिणामी सर्किट-2वर ताण येऊन लाईन्स ठिकठिकाणी ट्रीप झाल्या. केंद्रीय विद्युत प्राधिकरणाच्या माहितीनुसार मुंबईमध्ये सर्वात जास्त वीज लागते. २०१८-१९ या काळात मुंबईत २१ हजार ४७५ मिलियन युनिट्स वीज वापरली गेली. २०१९-२० या कालावधीत मुंबईकरांनी २१ हजार ९७७ मिलियन युनिट्स वीज वापरली. येणाऱया दशकात मुंबईची वीजेची गरज २.३ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details