थोडक्यात महत्त्वाचे : महाराष्ट्रातील घडामोडी - महाराष्ट्रातील घडामोडी
राज्यातील संपूर्ण महत्त्वाच्या घडामोडी थोडक्यात...
थोडक्यात महत्त्वाचे : महाराष्ट्रातील घडामोडी
राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी थोडक्यात...
- अहमदनगर -जिल्ह्यात गुरुवारी एकूण ७५७ रुग्ण आढळून आले. यात, जिल्हा रुग्णालय कोरोना टेस्ट लॅबमध्ये ४८, अँटीजेन चाचणीमध्ये ४०२ आणि खाजगी प्रयोगशाळा तपासणीत ३०७ बाधित आढळून आले आहेत. तसेच ३८५ बाधितांना डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत जिल्ह्यात कोरोना टेस्ट लॅब आणि अँटीजेन चाचण्यांच्या माध्यमातून ४५ हजार १७२ तपासण्या करण्यात आल्या आहेत. चाचण्या वाढवण्यात आल्यामुळे बाधित रुग्णांना शोधून त्यांच्यावर वेळेवर उपचार करणे शक्य होत आहे. दरम्यान, सार्वजनिक ठिकाणी वावरताना आरोग्य विषयक नियमांचे पालन करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. सध्या जिल्ह्यात २ हजार ९७६ रुग्णांवर उपचार सुरू आहे. तर बरे झालेल्यांची संख्या ४ हजार ९६५ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याची प्रमाण ६१.७५ टक्के आहे.
- परभणी -जिल्ह्यात गेल्या 36 दिवसात तब्बल 700 हून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या तीन महिन्यात 100 देखील कोरोनाबाधित आढळले नव्हते. दरम्यान, गुरुवारी परभणी जिल्ह्यातील 5 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे. तर नव्याने 54 रुग्ण आढळले आहेत. विशेष बाब, आतापर्यंतचे एका दिवसातील सर्वाधिक 250 संशयित रुग्णही गुरुवारी दाखल झाले.
- सांगली -जिल्ह्यात कोरोनाचा कहर कायम आहे. गुरुवारी दिवसभरात सहा जणांचा मृत्यू झाला. तर १६८ नवीन बाधितांची नोंद करण्यात आली. यामध्ये सांगली महापालिका क्षेत्रातील ११७ जणांचा समावेश आहे. तर ९८ जणांनी कोरोनावर मात केली. सध्या जिल्ह्यातील ऍक्टिव्ह रुग्ण संख्या २ हजार १२१ तर एकूण बाधितांची संख्या ३ हजार ९१६ झाली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी दिली.
- पालघर - जिल्ह्यातील ग्रामीण भागात गेल्या चोवीस तासांत 109 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर 3 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर 52 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 3 हजार 912 इतकी झाली आहे. तर एकूण 64 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत एकूण 2 हजार 956 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या ८९२ बाधितांवर उपचार सुरू आहेत.
- मीरा भाईंदर (ठाणे) -शहरात गुरुवारी 119 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तसेच 106 जणांनी कोरोनावर मात केली. तर सात जणांचा मृत्यू झाला. याबरोबरच येथील एकूण बाधितांची संख्या 9 हजार 75 इतकी झाली आहे. आतापर्यंत एकूण 298 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आज 106 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यांची रुग्णालयातून सुटका करण्यात आली आहे.आतापर्यंत 7 हजार 381 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर 347 जणांचा कोविड अहवाल प्रतिक्षेत आहे. सध्या 1 हजार 396 रुग्णांवर कोविड रुग्णालयात उपचार सुरू आहे.
- वसई-विरार (पालघर) - येथे गुरुवारी 161 नविन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर एका रुग्णाचा मृत्यू झाला. तर दिलासादायक बाब म्हणजे 177 जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. येथील एकूण बाधितांची संख्या 12 हजार 962 च्यावर पोहोचली आहे. आतापर्यंत एकूण 264 बाधितांचा मृत्यू झाला आहे. तर पालिका क्षेत्रातील 9 हजार 815 जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या 2 हजार 883 बाधितांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
- सिंधुदुर्ग -गौरी-गणपती उत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांकरिता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेस सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार ऑनलाईन बुकिंगही सुरू करण्यात आले आहे. चाकरमान्यांना मुंबई, मुंबई उपनगर, पुणे तसेच राज्यातील इतर ठिकाणांहून जिल्ह्यात येण्याची सोय परिवहन महामंडळाने केली आहे. जिल्ह्यातून चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासासाठीही 24 ते 31 ऑगस्ट या कालावधीत रोज 34 बसेस सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तिकीट नेहमीच्याच रातराणीच्या तिकीट दरानुसार एकेरी फेरीचेच असणार असल्याची माहिती विभाग नियंत्रक प्रकाश रसाळ यांनी दिली. तर चाकरमान्यांसाठी १० दिवसांचा क्वारंटाईन कालावधी राहणार असल्याचे राज्य शासनाकडून जाहीर करण्यात आले आहे. तसेच या प्रवाशांना ई-पास बंधनकारक असणार नाही. बसमधून केवळ २२ प्रवाशांनाच प्रवास करण्याची मुभा असणार आहे.
- नांदेड -कोरोनाच्या प्रसाराला रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने साथरोग प्रतिबंधक कायदा 1897 आणि आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 आणि भारतीय दंडसंहिता 188 नुसार जिल्ह्यातील विविध आस्थापनांसह सरकारी सेवा केंद्र, आधार नोंदणी केंद्र चालू ठेवण्यास मनाई केलेली होती. राज्यात मिशन बिगिन अगेन अंतर्गत काही निर्बंध सुकर करण्यासह नियम आणि अटींनुसार टाळेबंदीचा कालावधी 31 ऑगस्टपर्यंत वाढवून मार्गदर्शक सुचना आणि निर्देश मुख्य सचिव यांनी निर्गमीत केले आहेत. त्यानुसार नांदेड जिल्ह्यात यापूर्वी 19 जुलैला दिलेल्या आदेशातील अटी आणि शर्ती जशास तसे लागू करुन संपूर्ण जिल्ह्यात टाळेबंदीचा कालावधी पुढील आदेशापर्यंत वाढविण्यात आला आहे. जिल्ह्यातील आपले सरकार सेवा केंद्र, आधार नोंदणी केंद्र, सी.एस.सी. केंद्र, महा ई-सेवा केंद्र इत्यादी चालू आहेत. तथापि याठिकाणी बायोमेट्रिक पद्धतीने नवीन आधार नोंदणी, दुरुस्तीचे कामे बंद होती. आता जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी हे केंद्र खालील नमूद अटी व शर्तीच्या आधारे चालू करण्यास परवानगी दिली आहे.
- पिंपरी-चिंचवड (पुणे) - पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येने 26 हजारांचा टप्पा पार केला आहे. याठिकाणी दररोज नव्याने हजारो रुग्ण आढळत आहेत. दरम्यान, मनपाच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून 50 रेमडेसिवीर इंजेक्शन दिले आहेत. याचा वापर गोरगरीब रुग्णांसाठी करावा, असे यावेळी सांगण्यात आले. मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे हे इंजेक्शन राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेते विठ्ठल काटे यांनी दिले.
- नंदुरबार - जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढतच आहे. गुरुवारी तळोद्यातील दोन बाधितांचा मृत्यू झाला. यातील एकाचा नंदुरबार जिल्हा रूग्णालयात तर दुसर्या रूग्णाचा नाशिक येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. तसेच दिवसभरात चार नविन बाधितांची नोंद करण्यात आली. यामुळे जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 771 वर पोहोचली आहे. तर मृतांची संख्या 42 वर पोहोचली आहे.
- माढा (सोलापूर) - वडशिंगे ते कदम वस्ती रणदिवेवाडी जुना सापटणे (भोसे) रस्त्यावर संबधित शेतकऱ्यांनी अतिक्रमण केले आहे. तसेच याठिकाणी काटेरी झाडे आहेत. हे सर्व हटवून हा रस्ता वापरासाठी खुला करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी माढा तहसील कार्यालयाच्या समोर गुरुवारी आमरण उपोषण सुरू केले. या उपोषणाची दखल न घेतल्यास येत्या १५ ऑगस्टला कोणत्याही ठिकाणी आणि वेळी आत्मदहन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे. यासदंर्भात प्रशासनाला निवेदनही देण्यात आले आहे. या निवेदनात शासकिय रस्ता सर्व शेतकऱ्यांना वहीवाटिस मोकळा करुन द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच निवेदनाबरोबर वडशिंगे ग्रामपंचायतीचा ठराव, वडशिंगे गावचा नकाशा जोडून देण्यात आला आहे.