मुंबई -विद्यार्थ्यांच्या फी वाढीच्या मुद्द्यावर संपूर्ण राज्यातील पालक संघटना आक्रमक झाल्या असून मुंबई, नाशिक आणि पुण्यात लागोपाठ शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या विरोधात ठिकठिकाणी आंदोलन सुरू करण्यात आले आहे. गुरुवारी मुंबई शहरातील पालक संघटना वर्षा गायकवाड यांच्या शासकीय निवासस्थानी गेल्या होत्या. मात्र त्यांच्या मागणीवर समाधानकारक उत्तर न मिळाल्याने येत्या शनिवारपासून शिक्षणमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन करण्याचा इशारा ऑल इंडिया पॅरेंट्स असोसिएशनकडून देण्यात आलेला आहे.
फी वाढीच्या मुद्द्यावर शिक्षणमंत्री गंभीर नाहीत, शनिवारपासून आंदोलन - पालक संघटना खासगी शाळांकडून राज्य सरकारच्या आवाहनाला केराची टोपली कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण जगात आर्थिक मंदी आली आहे. अनेक नागरिकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. समाजातील प्रत्येक घटकांवर विपरीत परिणाम झाला असून कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करणे कठीण झाले आहे. तसेच, मुलांच्या शिक्षण पद्धतीत बदल होऊन ऑनलाईन शिक्षण प्रणाली स्वीकारली गेली आहे. मात्र, अशा आर्थिक संकटकाळात सुद्धा खासगी शाळांकडून फी वाढ करण्यात आली आहे. तसेच, काही शाळा अव्वाच्या सव्वा फी पालकांकडून वसूल करत आहेत. राज्य सरकारने मार्च 2020 मध्ये एक शासन आदेश काढला होता. ज्यात फी वाढ करू नये, असे आवाहन राज्यातील खासगी शाळांना करण्यात आले होते. मात्र शासनाच्या या आदेशाला खासगी शाळेने केराची टोपली दाखवली आहे.
हेही वाचा -रायगड : खालापूर पोलीस ठाण्याच्या ताब्यातील बोकड झाले गायब?
शिक्षक मंत्र्यांविरोधात शनिवारपासून आंदोलन
'शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आमचे निवेदन स्वीकारले आहे. मात्र, हे प्रकरण कोर्टात असल्याने आम्ही काही करू शकत नाही. आम्ही खासगी शाळांचे ऑडिट करण्याबद्दल विचार करू,' असे आम्हाला त्यांनी सांगितले. पण त्यांच्याकडून सकारत्मक उत्तर आम्हाला मिळालेले नाही. तसेच, शिक्षणमंत्र्यांनी खासगी शाळेचे सुरू असलेले ऑडिट सुद्धा थांबवण्यात आले आहे. त्यामुळे आम्ही गेल्या काही महिन्यांपासून आंदोलन करत आहोत. आजसुद्धा आम्हाला शिक्षण मंत्री पालकांच्या मागण्यांवर गंभीर दिसून आलेल्या नाहीत. त्यामुळे आम्ही येत्या शनिवारी पुन्हा आंदोलन करू, अशी प्रतिक्रिया ईटीव्ही भारतशी बोलताना ऑल इंडिया पॅरेंट्स असोसिएशन या पालक संघटनेच्या अनुभा श्रीवास्तव यांनी दिली.
गुजरात आणि राजस्थानप्रमाणे फी कमी करा
अनेक राज्यात 30 टक्के फी कमी करण्यात आली आहे. ज्या वेळी, आम्ही वर्षा गायकवाड यांना याबाबत विनंती केली तेव्हा त्यांच्याकडून आणि शिक्षण विभागाकडून हे प्रकरण उच्च न्यायालयात असल्याचे सांगत आम्ही काही करू शकत नाही, असे सांगण्यात येत आहे. आम्ही खासगी शाळेच्या ऑडीट करण्याची मागणी केली होती. पण आमची मागणीला धुडकावून लावली आहे. गुजरात, राजस्थान यासारख्या अनेक राज्यात 25 वरून 30 टक्के फी कमी केली आहे. पण महाराष्ट्र राज्यात आतापर्यंत ही झालेली नाही, अशी प्रतिक्रिया मुंबई पालक संघटनेचे राहुल मेहता आणि मिलिंद शहा यांनी ईटीव्ही भारताला दिली.
महाराष्ट्रात खासगी शाळांकडून पालकांची लूट
देशातील इतर राज्ये कोरोना काळात पालकांना शाळेचा फीत सूट देत आहे. पण महाराष्ट्रात आतापर्यंत सूट देण्यात आलेली नाही. उलट खासगी शाळेकडून फी वाढ करत पालकांची लूट सुरू केली आहे. हे लवकरात लवकर थांबविण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न करावेत. विशेष म्हणजे सध्याच्या फी रेग्युलेशन कायद्यामध्ये बदल करणे गरजेचे आहे. कारण फी रेग्युलेशन कायदा खासगी शाळांना फायदा करून देणारा आहे. विशेष म्हणजे, हा कायदाच फायद्यासाठी बनविण्यात आलेला आहे. त्यामुळे या कायद्यात बदल होणे फार गरजेचे आहे, अशी प्रतिक्रिया नवीन मुंबई पालक संघटनेचे सुनील चौधरी यांनी ईटीव्ही भारतला दिली आहे.
हेही वाचा -जन्मजात अंधत्व असणाऱ्या राहुलला परदेशी शिक्षणासाठी आर्थिक मदतीची गरज