महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Akshay Sanap Kurla : सर्व निवडणुका लढविल्या मात्र अपयश आलं, तरी खचून न जाता करतोय महापालिकेच्या निवडणुकीची तयारी - अक्षप सानप मुंबई कुर्ला पश्चिम

मुंबईच्या कुर्ल्यातील तरुण अक्षय सानप मागच्या काही वर्षांपासून लोकशाही पद्धतीने निवडणुका लढवत आहे. मात्र या तरूणाला आतापर्यंतच्या लढवलेल्या निवडणूकांमध्ये अपयश आले आहे. तरी आता हा तरूण खचून न जाता मुंबई महापालिकेच्या निवडणूकीसाठी तयारी करत आहे.

Akshay Sanap
अक्षय सानप

By

Published : Jan 21, 2023, 10:11 PM IST

Updated : Jan 21, 2023, 10:26 PM IST

अक्षय सानप ईटीव्हीशी संवाद साधताना

मुंबई : लहान मुलांना शाळेत तुम्हाला मोठे झाल्यावर काय व्हायचंय? हा प्रश्न विचारला जातो. त्यांच्या इच्छा विचारल्या जातात. सर्वजण आपल्याला मोठे झाल्यावर काय व्हायचे हे सांगत असतात. मात्र, यात कोणीही आपल्याला एखादा राजकीय नेता व्हायचे असे सांगत नाही. एखाद्याला राजकारणाची आणि नेतागिरीची आवड निर्माण होते ती महाविद्यालयीन जीवनात आल्यावर. मात्र, यात प्रत्येकाला आपल्या ध्येयाप्रमाणे राजकारणी किंवा लोकप्रतिनिधी होता येते असेही नाही. असाच एक मुंबईच्या कुर्ल्यातील तरुण अक्षय सानप मागच्या काही वर्षांपासून लोकशाही पद्धतीने निवडणुका लढवून आपले नशीब आजमावत आहे.


वडिलांचे स्वप्न करतोय पूर्ण : 31 वर्षीय अक्षप सानप मुंबईच्या कुर्ला पश्चिम येथे राहतात. उत्तर मध्य मुंबईतील कुर्ला पश्चिम हा त्यांचा विधानसभा मतदारसंघ आहे. अक्षय सध्या वडीलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपडत आहे. घराणेशाही राजकारणात देखील आहे. हे काही लपून राहिलेले नाही. पक्ष कोणताही असो घराणेशाही ही प्रत्येक पक्षात आहे. मात्र, राजकीय क्षेत्रात पदार्पण करून सर्व सामान्य कुटुंबातील व्यक्तीसुद्धा एक यशस्वी राजकारणी बनू शकतो, हे अक्षयला सिद्ध करायचे आहे.


आई वडील खाकीत मुलगा खादीत : अक्षय सानप हा एक मध्यमवर्गीय घरात जन्मलेला तरुण. अक्षयचे आई-वडील मुंबई पोलीस दलात कार्यरत होते. अक्षयच्या आई बेबीनंदा सानप या मुंबई पोलिसांत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावर होत्या. २०१६ साली त्या सेवानिवृत्त झाल्या. तर २०१० साली अक्षयच्या वडिलांचे निधन झाले. वडिलांच्या निधनानंतर घरातील कर्ता पुरुष म्हणून सर्व जबाबदाऱ्या अक्षयच्या खांद्यावर आल्या. मात्र, पोलिसांचा मुलगा असल्यामुळे समाजासाठी काहीतरी करायचे म्हणून अक्षयने राजकारणात प्रवेश केला. अक्षयने आतापर्यंत पाच निवडणुका लढवल्या आहेत. या प्रत्येक निवडणुकीत अक्षयला अपयश आले. मात्र, या अपयशाने खचून न जाता आता पुन्हा एकदा आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीला सध्या अक्षय लागला आहे.


लोकसभा ते पालिका निवडणूक सर्व लढला : ईटीव्ही भारतसोबत बोलताना अक्षयने सांगितले की, 2014 ला मी पहिली निवडणूक लढवली. त्यावेळी सहजच म्हणून मी माझा उमेदवारी अर्ज भरला होता. नंतर 2017 साली झालेल्या निवडणुकीत मला बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाकडून उमेदवारी मिळाली. त्यावेळी मला दिव्यांग बांधवांनी खूप मदत केली. मात्र तरीसुद्धा मला अपयश आले. त्यानंतर मी 2019 ची विधानसभा असेल 2019 ची लोकसभा निवडणुक असेल या निवडणुका लढलो. लोकसभा निवडणुकी वेळी माझ्याविरुद्ध भाजपच्या पूनम महाजन तर काँग्रेसच्या प्रिया दत्त होत्या. अशा मातब्बर उमेदवारांविरोधात मी ही निवडणूक लढलो होतो. एकूणच मला या निवडणुकांमध्ये अपयश येत असले तरी अनुभव मात्र बराच मिळत असल्याचे त्याने सांगितले.

चालवत आहे स्वतःचा कॅफे : आपल्या या राजकारणासोबतच घर खर्चाला हातभार लागावा म्हणून अक्षयने कुर्ला पश्चिमेलाच स्वतःचा एक कॅफे सुरू केला आहे. इथे तो बर्गर सँडविच अशा पद्धतीचे पदार्थ ठेवतो. विशेष म्हणजे या कॅफेमध्ये अक्षय स्वतः बसलेला असतो. सध्या अक्षयने आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीची तयारी करायला सुरुवात केली आहे. आता या निवडणुकांमध्ये अक्षयला यश मिळते की नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

हेही वाचा : Mumbai Municipal Elections : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपने ठोकले दंड, मिशन 150 ची घोषणा

Last Updated : Jan 21, 2023, 10:26 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details