मुंबई - राज्याचे मुख्य सचिव युपीएस मदान यांनी स्वेच्छा निवृत्ती घेतली आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेचे आयुक्त अजोय मेहता यांची राज्याच्या मुख्य सचिव पदी नियुक्ती करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
मदान यांची स्वेच्छा निवृत्ती, अजोय मेहता राज्याचे नवे मुख्य सचिव?
मुंबई महापालिकेचे आयुक्त अजोय मेहता यांची राज्याच्या मुख्य सचिव पदी नियुक्ती करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
देशात लोकसभा निवडणूक असल्याने आचारसंहिता सुरू आहे. त्यामुळे या प्रशासकीय बदलीला निवडणूक आयोगाची परवानगी आवश्यक आहे. यासंदर्भात राज्याचे अतिरिक्त निवडणूक आयुक्त दिलीप शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता, नव्या नियुक्ती बाबत अद्याप कोणतीही माहिती हाती आली नसल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, येत्या ३ दिवसांत अजोय मेहता मुख्य सचिव पदाची सूत्रे स्वीकारतील, अशी दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.
राज्याचे विद्यमान मुख्यसचिव यूपीएस मदान यांना महामंडळ अथवा महत्वाच्या आयोगाची जबाबदारी देण्यात येणार असल्याचे ही प्रशासकीय वर्तुळात चर्चा आहे. मदान यांच्या जागी अजोय मेहता यांची नियुक्ती झाल्यास मदान सर्वाधिक कमी काळ मुख्यसचिव पदी राहणारे अधिकारी ठरणार आहेत. गेल्या मार्च महिन्यात त्यांनी मुख्य सचिव पदाचा कार्यभार स्वीकारला होता. ऑक्टोबर महिन्यात ते सेवा निवृत्त होणार होते.