मुंबई- राज्याच्या मुख्य सचिवपदी असलेले युपीएस मदान यांनी आज अचानक स्वेच्छा निवृत्ती घेतल्याने मुख्य सचिव पद रिक्त झाले होते. या पदावर मुंबई महापालिका आयुक्त अजोय मेहता यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी मुख्यमंत्र्यांचे अप्पर मुख्य सचिव प्रवीण परदेशी यांची वर्णी लागली आहे. प्रवीण परदेशी हे गेल्या साडेचार वर्षांपासून मुख्यमंत्री कार्यालयात कार्यरत असल्याने मुख्यमंत्र्यांच्या खास मर्जीतील अधिकारी म्हणून ते प्रशासकीय वर्तुळात परिचित आहेत. लवकरच हे अधिकारी पदाची सूत्र स्वीकारणार आहेत.
मावळते मुख्य सचिव मदान यांनी स्वेच्छा निवृत्तीचा अर्ज दाखल केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तो तात्काळ मंजूर केला. करार पद्धतीने मुख्यमंत्र्यांच्या विशेष सल्लागार पदी मदान यांची नियुक्ती करण्यात आली असून या संदर्भात सामान्य प्रशासन विभागाने शासन आदेश निर्गमित केले आहेत. त्याच बरोबर पुढील आठवड्यात सिकॉमच्या अध्यक्षपदी युपीएस मदान यांची नियुक्ती करण्यासही मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आहे.