मुंबई- भाऊ-बहिणीचं अतूट नातं रक्षाबंधनाच्या धाग्यांनी अधिक घट्ट करणारा हा सण आपल्या सर्वांच्या घरात आनंद... चैतन्य... उत्साह घेऊन घेईल...रक्षाबंधनाचा सण समाजातील समस्त माता-भगिनींबद्दलचा मान-सन्मान, आदर वाढवणारा असेल. भाऊ-बहिणीचं पवित्र नातं साजरं करीत असताना समाजातील स्त्री-पुरुष समानतेची भावना या सणामुळे अधिक दृढ होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. रक्षाबंधनाचा हा सण भावांनी बहिणीच्या रक्षणाचा संकल्प करण्याचा, बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी घेण्याचा असला तरी, आज कोरोना संकटकाळात आपल्या अनेक महिला डॉक्टर भगिनी, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ, सफाई कर्मचारी, अंगणवाडी ताई, आशा ताई, महिला पोलीस, इतर महिला कर्मचारी असा मोठा भगिनीवर्ग जीवाची जोखीम पत्करुन समाजातील इतर भावांचं कोरोनापासून रक्षण करण्यासाठी लढत आहे. या समस्त भगिनीशक्तीच्या शौर्य, त्याग, समर्पणाबद्दल आज रक्षाबंधनाच्या निमित्ताने आपण सर्वांनी कृतज्ञ राहण्याची गरज आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील समस्त भगिनीशक्तीचा गौरव केला आहे.