मुंबई Ajit Pawar vs Sharad Pawar Dispute : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंडाळी करुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आपल्या काही सहकाऱ्यांसोबत राज्यातील शिंदे फडणवीस सरकारमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. अजित पवार उपमुख्यमंत्रीपदी तर काही सहकारी मंत्रीपदी विराजमान झाले. मंगळवारी अजित पवार गटाला महायुती सरकारमध्ये सामील होऊन 100 दिवस पूर्ण झाले आहेत. त्यानिमित्तानं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनतेसोबत भावनिक पत्राच्या माध्यमातून संवाद साधला आहे. 100 दिवस दिल्लीपुढं महाराष्ट्र गहाण टाकण्याचे आहेत, अशी टीका शरद पवार गटानं केली आहे.
शरद पवार यांचा पत्रात कुठेही उल्लेख नाही :राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी महायुती सरकारमध्ये सामील होऊन उपमुख्यमंत्री पदाची सूत्रे हातात घेतली. त्यानंतर वारंवार राष्ट्रवादी पक्ष आपलाच असल्याचा दावा अजित पवार गटाकडून करण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह कोणाचं हा वाद आता निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचला आहे. तर दुसऱ्या बाजुला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सत्तेत सहभागी होऊन 100 दिवस झाल्याबद्दल पत्राच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक्स सोशल मीडियावर पोस्ट केलं. पत्राच्या सुरुवातीलाच अजित पवार राष्ट्रीय अध्यक्ष, अशा प्रकारचा उल्लेख करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा कुठेही पत्रात उल्लेख नाही.
लोककल्याण धोरणांचा जपला वारसा :पत्रात म्हटले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 10 ऑक्टोबरला महायुती सरकारमध्ये सामील होऊन शंभर दिवस पूर्ण झाले आहेत. राष्ट्रवादी पक्ष नेहमीच युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज, फुले शाहू आंबेडकरांचे विचार आणि यशवंतराव चव्हाण यांचे लोककल्याणाचे धोरणांचा वारसा नेहमीच जपला आहे. पुढील काळात माझ्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तीच परंपरा कायम ठेवणार असल्याचं वचन अजित पवार यांनी पत्रातून जनतेला दिलं आहे. राज्यातील राजकारणात यापूर्वी देखील अनेक मोठ्या नेत्यांनी वेगवेगळी राजकीय भूमिका घेतली आहे. राजकीय आणि सामाजिक परिस्थितीप्रमाणं प्रत्येक राजकीय नेत्याला त्या त्या वेळी राजकीय निर्णय घ्यावे लागतात. अशाच प्रकारचा निर्णय घेऊन माझ्या नेतृत्वाखाली 2 जुलै 2023 पक्ष महायुती सरकारमध्ये सामील झाला, असं अजित पवार यांनी यावेळी स्पष्ट केलं.