मुंबई :राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधितांच्या आकडेवारीत दिवसागणिक भर पडत आहे. सध्या 6086 इतके सक्रिय रुग्ण आहेत. वाढत्या रुग्णसंखेच्या पार्श्वभूमीवर पूर्वानुभव लक्षात घेता, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासन, महापालिका आणि आरोग्य यंत्रणा कामाला लागली आहे. कोविड प्रतिबंधक उपाययोजना राबवल्या जात आहेत. वयोवृद्ध, विविध व्याधी असलेल्यांना मास्क लावणे बंधनकारक केले आहे. दुसरीकडे लसीकरणावर भर दिला आहे. लसींची कमतरता होऊ नये, यासाठी राज्य सरकारने हैदराबाद येथील भारत बायोटेककडून सुमारे दोन लाख लसींच्या कुपी खरेदी करणार आहे.
2 लाख कुपी घेणार :मागील दोन वर्ष कोरोनाने नागरिकांना बंदिस्त केले होते. उद्योग धंदे, व्यापार, रोजगार, शिक्षण बंद होते. दरम्यान, कोविडवर मात करण्यासाठी सरकारने कोविड लसींचे डोस देण्यास सुरुवात केली. केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला आतापर्यंत मिळालेल्या लसींमध्ये एकूण 1,899,78,562 लोकांनी लसीचा डोस घेतला आहे. पहिला आणि दुसरा डोस घेणाऱ्यांची आकडेवारी देखील लक्षणीय आहे. आता पुन्हा एकदा राज्य सरकार परराज्यातून 2 लाख कोविड लस आयात करणार आहे. प्रतीलसींची किंमत 342 रुपये इतकी असून दोन लाख लसींसाठी सरकारला 6 कोटी 82 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. राज्य सरकारने यासाठी नियमावली दिली आहे. सध्या बायोटेकसोबत बोलणी झाली आहे. लवकरच ते खरेदी करण्यात येणार असल्याचे समजते.