मुंबई :गुजरात आणि हिमाचल प्रदेश या दोन राज्याच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल जवळजवळ स्पष्ट झाले आहेत. गुजरात मध्ये भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे. गुजरातमध्ये अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने निवडणुकीत उडी घेतल्याने त्याचा फटका काँग्रेस पक्षाला बसणार हे राजकीय विश्लेषकांनी आधीच सांगितलं होतं. त्याचप्रमाणे काँग्रेसला तो फटका बसताना पाहायला मिळतो आहे. अद्याप काँग्रेस आणि आम आदमी पक्षाच्या मतांची टक्केवारी समोर आली नसली तरी मिळालेल्या कलानुसार त्यांना फटका दिसत असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी व्यक्त केले आहे. यशवंतराव चव्हाण सेंटर येथे पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी निवडणुकीच्या निकालावर प्रतिक्रिया दिली आहे. (ajit pawar reaction on gujrat election 2022).
काय म्हणाले अजित पवार ? : हिमाचल प्रदेश मध्ये काँग्रेसला विजय मिळवता आला असला तरी नुकत्याच झालेल्या दिल्ली महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये 'आप'ने बाजी मारली आहे. त्यामुळे निवडणुकीचे मिश्र निकाल पाहायला मिळत आहेत, असं मत अजित पवार यांनी व्यक्त केलं आहे. तसेच हार्दिक पटेल यांनी काँग्रेस पक्ष सोडून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला मात्र त्यांचा विजय सुकर झाला नाही. ते पराभूत होतील अशी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे पक्ष बदलल्यामुळे हार्दिक पटेल याला लोकांनी प्रतिसाद दिला असं वाटत नाही. तसेच या निवडणुकांमध्ये ज्यांना यश मिळालं नाही त्यांनी पुढच्या वेळेस अजून जोमाने कामाला लागावे असे अजित पवार यांनी म्हटले आहे.