मुंबई : मुंबईत वसतीगृहात मुलीवर अत्याचाराची घटना घडणे हे सरकारचे अपयश आहे. सरकारने या घटनेची चौकशी करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे.
'घटनेचा तपास पारदर्शकपणे व्हायला हवा' :अजित पवार म्हणाले की, 'मुंबईत अशा घटना कशा काय घडतात? राज्यातील कुठल्याही कानाकोपऱ्यात मुलींना आणि महिलांना सुरक्षित वाटले पाहिजे. मात्र तसे होताना दिसत नाही. याला पोलीस आणि सरकार जबाबदार आहे. या घटनेचा तपास अत्यंत पारदर्शकपणे झाला पाहिजे. सावित्रीबाई फुले वसतीगृहात 450 मुलींची व्यवस्था आहे. मात्र 10 टक्केच मुली या वस्तीगृहात राहत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यातही एकच मुलगी चौथ्या मजल्यावर राहत होती. पोलिसांनी वसतीगृहाच्या महिला रेक्टरची चौकशी केली आहे.'
'मुलीला आणि पालकांना न्याय मिळाला पाहिजे' :ते पुढे म्हणाले की, वसतिगृहाच्या जवळून मोठा रस्ता जातो. या परिसरात अनेक व्हीआयपी मंत्री ये-जा करत असतात. त्यामुळे हे वसतिगृह अडगळीत होते असे म्हणता येणार नाही. ज्याने हे कृत्य केलं त्याने स्वत: आत्महत्या केली आहे. आमच्या मुलीला एकटीलाच चौथ्या मजल्यावर का ठेवलं?, असा मुलीच्या पालकांचा प्रश्न आहे.' अजित पवार यांनी मुलीला आणि तिच्या पालकांना न्याय मिळाला पाहिजे, अशी मागणी केली आहे.