रविवारी दुपारी अजित पवार आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. राष्ट्रवादीसोब बंड करून अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस यांच्यासोबत घरोबा केला आहे. यावर महाविकास आघाडीतील नेत्यांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे. तर, भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेने अजित पवार यांचे स्वागत केले आहे.
मुंबई - मंत्रिमंडळाचा विस्तार होईल आणि आपल्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडेल अशी आशा शिवसेनेच्या अनेक नेत्यांना होती. वर्षभर लांबलेला विस्तार अखेर आज झाला, पण या विस्तारात शिवसेनेच्या एकाही नेत्याला मंत्रिपद मिळाले नाही. राष्ट्रवादी काँग्रेसला एकाच झटक्यात नऊ मंत्रिपदे गेल्याने भविष्यात फार काही हाती लागेल अशी अपेक्षाही संपल्याने शिवसेनेमध्ये सध्या प्रचंड अस्वस्थता पसरल्याचे चित्र आहे.
राष्ट्रवादीमध्ये उभी फूट -एकनाथ शिंदेंच्या बंडाला वर्ष झाल्यानंतर राज्यात आणखी एक राजकीय भूकंप झाला आहे. अजित पवारांनी काही आमदारांना हाताशी घेत सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. अजित पवार आणि आठ आमदारांनी राजभवनावर रविवारी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर अजित पवार यांनी राष्ट्रवादी पक्षावर दावा केला. शरद पवार आणि जयंत पाटील यांनी या पाठिंब्याला राष्ट्रवादीचा पाठिंबा नसल्याचे सांगितले. त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडल्याचे निश्चित झाले.
अजित पवारांना कोणाचा पाठिंबा - राष्ट्रवादीच्या अनेक आमदारांचा अजित पवार यांना पाठिंबा असल्याचे सुत्रांनी सांगितले आहे. शरद पवार यांनीही याविरोधात दंड ठोठावत मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. याची मला अजिबात चिंता नाही. कोणी कितीही पक्षावर दावा केला तरी जनता माझ्यासोब असल्याचे शरद पवार यावेळी म्हणाले.
अजित पवारांसोबत असलेले आमदार - छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, आदिती तटकरे, संजय बनसोडे, अनिल पाटील, धर्मरावबाबा आत्राम, किरण लहमाटे, निलेश लंके, दौलत दरोडा, मकरंद पाटील, अतुल बेनके, सुनिल टिंगरे, इंद्रनील नाईक, अशोक पवार, अण्णा बनसोडे, सरोज अहिरे, बबनदादा शिंदे, यशवंत माने, नरहरी झिरवळ, दत्ता भरणे, शेखर निकम, दीपक चव्हाण, राजेंद्र कारेमोरे, नितीन पवार, मनोहर चंद्रिकापुरे, संग्राम जगताप, राजेश पाटील, सुनील शेळके, दिलीप मोहिते अशी अजित पवार यांना पाठिंबा असलेल्या आमदारांची नावे आहेत. दरम्यान, सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही नावे देण्यात आली आहे. याबाबत अजून स्पष्टता मिळालेली नाही.
जयंत पाटलांची प्रतिक्रिया -कोणतीही माहिती न देता काही कागदांवर स्वाक्षरी केली असल्याचे काही आमदारांनी म्हटले असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे. पक्षाच्या मान्यतेशिवाय सत्ता पक्षाकडे जाऊन काही आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली असल्याचे पाटील यांनी म्हटले.
नवीन विरोधी पक्षनेते - अजित पवारांकडे उप मुख्यमंत्रिपद सोपवण्यात आले आहे. अजित पवारांनी बंड केल्याचे समोर आल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसमधील नव्या नेत्यांकडे काही जबाबदारी देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रतोद आणि विरोधी पक्ष नेतेपदी जितेंद्र आव्हाड यांची नेमणूक करण्यात आली आहे.