मुंबई Ajit Pawar Group X Account Suspended : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंडखोरी करून अजित पवारांनी शिंदे फडणवीस सरकारला साथ देत स्वतः उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. यानंतर राष्ट्रवादी पक्ष आमचा असल्याचा दावा वारंवार अजित पवार गटाकडून केला जातोय. एका बाजूला राजकीय लढाई सुरू असताना दुसरीकडे सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील अजित पवार गट अॅक्टिव्ह झालंय. मात्र, आज अजित पवार गटाचं एक्स म्हणजेच आधीचं ट्विटर अकाउंट सस्पेंड करण्यात आल्यानं वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. अजित पवार गटाचं एक्स अकाउंट सस्पेंड होण्याची अनेक कारणे सायबर एक्सपर्टंनी सांगितली आहेत. (NCP Controversy)
अकाउंट सस्पेंड होण्याची काय आहेत कारणं : ट्विटर म्हणजेच सध्याचं एक्स अकाउंटच्या अटी आणि शर्तींचा भंग करणाऱ्या अकाउंटवर कारवाई केली जाते. ती वेगवेगळ्या स्वरुपाची असू शकते. त्यामध्ये अकाउंट रीड ओन्ली मोडला आणणे. प्रोफाईल एडिट करणे, नवीन ट्विट पोस्ट करता न येणे, काही तात्पुरत्या स्वरूपात निलंबन किंवा कायमस्वरुपी निलंबन म्हणजे सस्पेंड अशी कारवाई केली जाते. चुकीच्या जाहिरातीसाठी काही अकाउंट हा प्लॅटफॉर्म वापरतात. तसंच द्वेषयुक्त, तेढ निर्माण करणारा मजकूर प्रसारित करतात. कायद्याचे उल्लंघन करणारे माहितीही टाकतात. त्यांचे अकाउंट सस्पेंड केले जाते. मात्र या प्रकरणामध्ये शरद पवार गटाने अजित पवार गटाच्या ट्विटर हँडल संदर्भात तक्रार केली होती. अजित पवार गटाचं ट्विटर हँडल नंतर तयार झालेलं आहे. शरद पवार गटाचं अकाउंट आधी तयार झालं आहे. यामुळे अजित पवार गटाच्या अकाउंटची क्रिएशनची तारीख नंतरची आहे. अजित पवार गटाच्या ट्विटर हँडलला ऑफिशिअल जरी लागले असले तरी ते अधिकृत नाही. तसंच अजित पवार अद्याप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर कायदेशीररित्या स्वतःची मालकी सिद्ध करू शकले नाहीत. यामुळे अशा प्रकारे आदेश ते ट्विटरला दाखवू शकत नाही. ज्यावेळी अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मालक असल्याचं कायदेशीर पत्र ते दाखवतील तेव्हा ते ट्विटर अकाउंट पुन्हा सुरु होईल. तूर्तास तरी ट्विटरच्या मते शरद पवार हेचं कायदेशीर मालक आहेत, अशी माहिती सायबर एक्स्पर्ट विक्रांत पाटील यांनी दिलीय.