मुंबई :अजित पवार यांनी शिंदे फडणवीस सरकारला साथ देण्याचा निर्णय घेऊन राज्यात राजकीय भूकंप घडवला. त्यानंतर अजित पवार यांनी त्यांच्या 8 सहकाऱ्यांसह मंत्रिपदाची शपथ घेतली. तसेच अजित पवार गटाने निवडणूक आयोगाकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि चिन्हावर दावा ठोकला आहे. निवडणूक आयोगासमोर होणाऱ्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी प्रत्येक जिल्हाध्यक्षांकडून पाच हजार प्रतिज्ञापत्रे सादर करण्याचे आवाहन केल्याचे समोर येत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह चिन्हावर दावा :राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर अजित पवार यांनी राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हावर दावा केला आहे. त्यानंतर निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला नोटीस बजावली असून आपले मत तीन आठवड्यात त्यांना माडण्याचे सांगण्यात आले आहे. त्यापूर्वी अजित पवार यांच्यासह 8 मंत्र्यांनी शपथ घेतल्यानंतर निवडणूक आयोगाकडे कागदपत्रे सादर केली होती. राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी अजित पवार यांची निवड करण्यात आली होती. यावर 40आमदारांच्या सह्याचा ठराव 30 जूनच्या बैठकीत घेतल्याचा दावा करण्यात आला होता.
चेंडू निवडणूक आयोगात :अजित पवार गटाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह चिन्हावर दावा केल्याने शरद पवार गटाला निवडणूक आयोगाल उत्तर द्यावे लागणार आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी पक्षाचे नाव तसेच चिन्हाबाबत खरी लढाई दोन्ही राष्ट्रवादी गटात पाहायला मिळणार आहे. शरद पवार गटाकडून कपिल सिब्बल, देवदत्त कामत आणि अभिषेक मनु सिंगवी हे कायदेशीर कामकाज पाहणार असल्याची माहिती मिळत आहे.
अजित पवार गट लागला तयारीला :उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खरा राष्ट्रवादी पक्ष आमचाच असल्याचे वारंवार सांगितले आहे. त्यामुळे अजित पवार गट निवडणूक आयोगापुढील सुनावणीला समोर जाण्यासाठी सज्ज झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे अजित पवार यांनी निवडणूक आयोगाच्या सुनावणीचा एक भाग म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक जिल्हाध्यक्षांना पाच हजार शपथपत्रे भरून देण्याचे सांगितले असल्याची माहिती समोर येत आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार, खासदार यांनी आपली शपथपत्रे यापूर्वीच जमा केली आहेत. निवडणूक आयोगकडे कागदोपत्री आपली बाजू भक्कमपणे मांडता यावी, यासाठी अजित पवार गटाने कंबर कसली असल्याचे बोलले जाते आहे.
हेही वाचा -Sanjay Raut On Manipur Violence: केंद्र सरकार असंवेदनशील, विरोधी पक्षांच्या शिष्टमंडळासोबत खासदार अरविंद सावंत मणिपूरला जाणार- संजय राऊत