मुंबई : संभाजी भिडे यांच्या वादग्रस्त विधानाविरोधात मुंबईत अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आक्रमक झाला आहे. मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष नरेंद्र राणे यांच्या नेतृत्वाखाली पक्ष कार्यालय ते मंत्रालयासमोरील महात्मा गांधी पुतळापर्यंत मूक मोर्चा काढण्यात आला. मूक मोर्चात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी डाव्या हाताला काळी फीत बांधून संभाजी भिडे यांच्या विरोधात निषेध नोंदविला. महात्मा गांधी आणि राष्ट्रपुरुषांचा अपमान करणाऱ्या मनोहर भिडेचा जाहीर निषेध करणारे फलक हातात घेऊन मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.
कायद्याप्रमाणे कारवाई व्हावी: संभाजी भिडे यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याविरोधात काँग्रेस पक्ष आक्रमक झाला असून भिडे यांना अटक करण्याची मागणी केली जात आहे. तर दुसरीकडे अजित पवार गटाच्या मुंबई काँग्रेस पक्षाकडून संयमी भूमिका घेतल्याचे पाहायला मिळत आहे. मनोहर भिडे हे नेहमीच वादग्रस्त वक्तव्य करून राज्यातील वातावरण बिघडवत आहेत. त्यांच्या अशा वादग्रस्त वक्तव्याचा मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने निषेध नोंदविण्यात आला. सत्तेत असताना तुम्हाला आंदोलन करायची वेळ येते आणि काँग्रेस भिडेंच्या अटकेची मागणी करत आहे. तर आपल्या पक्षाची काय असणार मागणी या प्रश्नाला उत्तर देताना, संजय तटकरे यांनी कायद्याच्या तरतुदीनुसार कारवाई करण्यात यावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.