मुंबई Ajit Pawar Group Opinion:राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोन गट पडल्यानंतर अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षचिन्ह आपलचं असल्याचा दावा विधानसभा अध्यक्ष (Rahul Narvekar) आणि केंद्रीय निवडणूक आयोगासमोर केला होता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हाचा वाद सर्वोच्च न्यायालय, केंद्रीय निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्ष यांच्या समोर सुरू आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांना आपापलं म्हणणं मांडण्यासाठी एका आठवड्यांची मुदत दिली होती. त्यानुसार शरद पवार गटाच्या 10 आमदारांनी 10 पानी लेखी स्वरूपात आपलं म्हणणं दोन दिवसांपूर्वीच वकिलामार्फत विधानसभा अध्यक्षाकडे पाठवलं आहे.
म्हणणं मांडण्यास मुदत वाढ द्या :शरद पवार गटाने अजित पवार यांच्यासह गेलेल्या सर्व आमदारांना अपात्र करण्यासाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे याचिका दाखल केली. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष यांनी अजित पवार गटाला आपलं म्हणणं मांडण्यासाठी एक आठवड्याची मुदत दिली होती; मात्र अजित पवार गटाला आपलं म्हणणं मांडण्यासाठी 1 महिन्याची मुदत वाढ हवी आहे. त्यासाठी त्यांनी विधानभवन प्रशासनाकडे मुदत वाढवून मिळावी अशी मागणी केली असल्याची माहिती समोर येत आहे. परंतु, 31 जानेवारी पर्यंत सुप्रीम कोर्टाच्या निर्देशनुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 51 आमदारांच्या अपात्रे संदर्भात निर्णय देणे बंधनकारक आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी एक महिना मुदतवाढ न देता दोन आठवडा मुदतवाढ देणार असल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे.