मुंबई-विरोधी पक्षनेते व राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार हे भाजपसोबत जाणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात जोरदार सुरू आहे. मागील आठवड्यात अजित पवार काही तासांसाठी ते अनरिचेबल होते. मात्र, त्यांनी त्याबाबत खुलासा केला होता. तरीही अजित पवार हे काही आमदारांना सोबत घेऊन भाजपसोबत जाणार असल्याची चर्चा आहे.
अजित पवार यांच्यावर आमचा विश्वास -संजय राऊत म्हणाले की, अजित पवार हे राष्ट्रवादीतले ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळे ते भाजपसोबत जातील असे वाटत नाहीत. अजित पवार यांना राष्ट्रवादीतच उज्जवल भविष्य आहे. अजित पवार यांचे राजकीय भवितव्य राष्ट्रवादीसोबत उज्ज्वल आहे. त्यामुळे काळजी करण्यासारखे काही नाही. ते भाजपसोबत कधीच जाणार नाहीत आणि भाजपचे गुलाम होणार नाहीत. अजित पवार यांच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे, असेही संजय राऊत यावेळी म्हणाले.
भाजपची गुलामी करणार नाही - येत्या काही दिवसांत अजित पवार आणि नाना पटोले यांच्याशी चर्चा होणार असल्याचे संजय राऊत यांनी नमूद केले आहे. नागपुरात आमची वज्रमूठ सभा असून, त्यावेळी देखी आम्ही महाविकास आघाडीतील सर्व नेते चर्चा करणार आहोत. पण अजित पवार हे भाजपसोबत जाणार या सर्व बातम्या पेरल्या जात आहेत. त्यात काहीच तथ्य नाही. आमचा अजित पवार यांच्यावर विश्वास असून, ते भाजपची गुलामी करणार नाहीतॉ, असे संजय राऊत यावेळी म्हणाले.