मुंबई : अजित पवार आणि त्यांच्या समर्थकांनी भाजप नेत्यांशी जवळीक वाढवून ज्या पद्धतीने राजकीय खेळी केली, त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. या आधी त्यांच्यासोबत असलेल्या आमदारांचा मंत्रिमंडळात समावेश होणार होता. मात्र अद्याप याबाबत अंतिम निर्णय झालेला नाही. आता तर ते ज्या नेत्यांना विरोध करत होते, त्यांनाच सत्तेत भागीदार केले आहे.
अनेक नेत्यांनी नाराजी व्यक्त केली : अजित पवार आणि त्यांच्यासोबत असलेले बहुतांश आमदार हे राज्यातील बडे नेते आहेत. या नेत्यांचा महत्वाच्या मंत्रिपदांवर डोळा आहे. हेच शिंदे गटाला मान्य नाही. मंत्रिपदांचे समान वाटप व्हावे, अशी शिंदे गटाची इच्छा आहे. असे नाही की शिंदे गटाच्या नाराजीचे फक्त तर्क-वितर्क लावले जात आहेत. शिंदे गटाच्या अनेक नेत्यांनी यावरून आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली आहे.
'सत्तेत सामावून घेण्याची काही घाई नव्हती' : शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी माध्यमांसमोर आपली भूमिका मांडली आहे. शिरसाट म्हणाले की, 'भाजप आणि शिवसेनेकडे पुरेसे बहुमत होते. त्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांना सत्तेत सामावून घेण्याची काही घाई नव्हती'. उद्धव ठाकरे हे शरद पवारांच्या फारच जवळ गेल्याने आम्ही त्यांच्याविरुद्ध भूमिका घेतल्याचे शिरसाट म्हणाले. त्यांच्या म्हणण्यानुसार, उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करून शरद पवार सर्व निर्णय स्वत: घेत असत. आमच्याकडे दुर्लक्ष झाले म्हणून आम्ही बंड केले, असे ते म्हणाले.
'हा निर्णय भाजपचा' : शिवसेनेचे आणखी एक आमदार भरत गोगावले यांनी तर राष्ट्रवादीच्या सहभागाने अर्धी भाकरी खावी लागेल, असे म्हटले आहे. तसेच हा निर्णय भाजपचा असल्याचे गोगावले यांनी स्पष्ट संकेत दिले आहे. गोगावले यांच्या म्हणण्यानुसार या निर्णयामुळे शिंदे गटातील आमदारांमध्ये नाराजी आहे. शिवसेनेचे खासदार गजानन कीर्तिकर यांनी देखील आपली नाराजी व्यक्त केली आहे.