मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा आठवडा असून विरोधकांनी शेतकऱ्यांचा मुद्दा मोठ्या प्रमाणामध्ये लावून धरलेला आहे. विरोधकांनी ५७ अन्वये शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर चर्चा करण्याची विनंती सभागृहात केली होती. पण सरकार तयार नसल्याने विरोधकांनी सभात्याग केला आहे. दरम्यान, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून सरकारवर जोरदार टीका केली आहे.
पवारांचा सरकारला सवाल :सभात्याग केल्यावर विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले की, आजपासून अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्याला सुरूवात झाली. राज्यात मागील २ दिवसात झालेल्या गारपीठ व अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आम्ही या मुद्द्यावर चर्चेसाठी ५७ ची नोटीस दिली होती. शेतकरी गारपीठ व वीज कोसळून मेटाकुटीला आला आहे. शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सरकार सांगत आहे की आम्ही सर्व करत आहोत. पण सरकारी कर्मचारी यांचा संप सुरू असल्याने पंचनामे होत नाहीत. २२ तारखेला मराठी वर्षाची सुरुवात गुढीपाडव्याने होत आहे. शेतकऱ्यांनी नवीन वर्षाची सुरुवात कशी करायची?, असा प्रश्न पवार यांनी विचारला आहे.
तातडीच्या मदतीची मागणी :सरकारी कर्मचारी यांचा संप सुरू असल्याने पंचनामे होत नाहीत. ९५ टक्के सरकारी कर्मचारी यांच्या घरात पैसे ठेवायला जागा नाही, असे विधान सरकारमधले आमदार करत आहेत. पेपर तपासायला शिक्षक तयार नाहीत. तातडीची मदत द्यायला हवी. आमच्या मविआ सरकारने शेतकऱ्यांना मदत दिली होती. सरकारला घाम फुटत नाही. हे दुर्दैव असल्याचे देखील अजित पवार यांनी सांगितले.