मुंबई : विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना अजित पवार यांनी राज्याच्या कायदा सुव्यवस्थेच्या परिस्थितीवर कडाडून टीका केली आहे. राज्यात जुगार, मटका, डान्सबार हे अवैध धंद्यांचे प्रमाण वाढले आहे. तलवारी, कोयते नाचवत रस्त्यावर फिरवून दहशत निर्माण केली जात आहे. दिवसाढवळ्या गुंड गोळ्या घालून लोकांच्या हत्या करत असून व्यावसायिकांच्या हत्या होत आहे. इतकच काय पण सत्तारूढ पक्षाच्या कार्यकर्त्यांनाही त्याचा प्रसाद मिळतो आहे. त्यामुळे सरकारने याची दखल घेतली पाहिजे, असे ते म्हणाले.
कायदा व सुव्यवस्था बिघडली : राज्यातील कायदा सुव्यवस्था पूर्णतः बिघडली असून कोयता यांची दहशत पुण्यापाठोपाठ आता नाशिक शहरातही वाढली आहे. मुंबईमध्ये देखील दिवसाढवळ्या तलवारी नाचवत गुंड फिरतात हल्ले करतात. सर्वसामान्य नागरिकांना सुरक्षितता वाटेल असे कुठलेही वातावरण शिल्लक नाही. केवळ गुंडांना अटक करून चालणार नाही. त्याच्या मुळाशी गेले पाहिजे, असेही अजित पवार यावेळी म्हणाले. तर नागपूर शहराची खुलेआम हफ्ते खोरी सुरू असून दोन गुन्हेगारांना बाहेर काढण्यासाठी पोलिसांनी दीड लाख रुपयांची मागणी केल्याची ध्वनिफीत वायरल झाल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
राज्यात अवैध धंदे सुरू :राज्यात मटका, जुगार , गुटखा आणि डान्सबार यांना बंदी असूनही राजरोसपणे हे सर्व धंदे सुरू आहेत. राज्यात ऑनलाइन लॉटरी आणि रमीचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढले आहे. या जुगारातून ग्रामीण भागातील लोकांची आणि शेतकऱ्यांची फसवणूक केली जात आहे. तरुण पिढी या जुगाराकडे वळत आहे. ऑनलाइन रमीची जाहिरात काही अभिनेते करीत आहेत. त्यामुळे तरुण या जाळ्यात अडकत असल्यामुळे त्यावर कारवाई करावी, असे ते म्हणाले. तर महाराष्ट्रात डान्सबार बंदी असतानाही मोठ्या प्रमाणात डान्सबार सुरू आहेत. मुंबई, ठाणे, नवी मुंबई इतर ठिकाणी ऑर्केस्ट्राच्या नावाखाली डान्सबार सुरू आहेत, यावर कडक कारवाई व्हावी, असे ते म्हणाले.