मुंबई: अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या 9 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. आदिती तटकरेंच्या रुपात शिंदे सरकारमध्ये प्रथमच महिला मंत्र्यांचा समावेश झाला आहे. यासह जेष्ठ नेते व माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, अजित पवारांचे खंदे समर्थक धनंजय मुंडे तसेच ठाकरे सरकारमध्ये मंत्री राहिलेले हसन मुश्रीफ यांनी देखील मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. यासह दिलीप वळसे पाटील, संजय बनसोडे, धर्मरावबाबा आत्राम आणि अनिल भाईदास पाटील यांनी मंत्री पदाची शपथ घेतली.
अजित पवार यांची नवीन प्रोफाईल अजित पवारांना 30 ते 40 आमदारांचा पाठिंबा? : अजित पवारांना सध्या राष्ट्रवादीच्या 30 ते 40 आमदारांचा पाठिंबा असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच पक्ष प्रतोद व विधानसभा उपाध्यक्षांनीही त्यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे आता ते देखील एकनाथ शिंदेंप्रमाणे पक्षावर दावा ठोकतील का?, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. तसा दावा ठोकला तर पक्ष त्यांचाच होईल, असे देखील बोलले जात आहे. शपथविधीनंतर बोलताना अजित पवार म्हणाले की, आम्ही राष्ट्रवादी पक्ष म्हणून सरकारमध्ये प्रवेश केला आहे. आम्ही आगामी निवडणुका राष्ट्रवादीच्या चिन्हावर लढवणार असल्याचेही ते म्हणाले आहेत.
अजित पवार नाराज : मागील काही दिवसांपासून अजित पवार हे नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. 10 जूनला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २४ वा वर्धापन दिन पार पडला. या दिनाचे औचित्य साधत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षात काही नवीन नियुक्त्या केल्याची घोषणा केली होती. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून खासदार प्रफुल्ल पटेल आणि खासदार सुप्रिया सुळे यांची नियुक्ती केली होती. यावेळी त्यांनी इतरही काही नेत्यांची आणि पदाधिकाऱ्यांची विविध पदांवर नियुक्ती केली. परंतु यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्याकडे मात्र कोणतीच नवीन जबाबदारी दिली नव्हती. त्यामुळे त्यांच्या नाराजीचे मोठे कारण समजले जात होते.
सरकारमध्ये सहभागी: सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल पक्षाचे कार्याध्यक्ष झाल्यानंतर अजित पवार नाराज असल्याची चर्चा होती. त्यामुळे ते भाजपसोबत कधीही जाऊ शकतात, असे सांगण्यात आले. मला पक्षाची जबाबदारी द्या, विरोधी पक्षनेतेपदावरून मुक्त करा आशी मागणी त्यांनी केली होती. यासाठी अजित पवार यांनी ३१ जुलैपर्यंतचा अल्टिमेटम दिला होता. परंतु पक्षाकडून कोणताही निर्णय न झाल्याने अजित पवार नाराज झाले असून आता ते फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले आहेत.
हेही वाचा:
- Maharashtra Political Crisis Live : पुढील निवडणुका मोदींसोबत लढणार - अजित पवार
- NCP Political Crisis : घड्याळ चिन्हावरच निवडणूक लढवणार, पक्ष म्हणूनच सरकारमध्ये सहभागी - अजित पवार
- Maharashtra Political Crisis : ... म्हणून आम्ही एकत्र आलो; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया