मुंबई :राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पक्षाच्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्याचा निर्णय मागे घेतला. त्यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन या निर्णयाची माहिती दिली. मात्र त्यांच्या या पत्रकार परिषदेला त्यांचे पुतणे व विरोधी पक्ष नेते अजित पवार आणि त्यांची कन्या व खासदार सुप्रिया सुळे अनुपस्थित होते. यावर शरद पवार यांनी, 'सगळेच सगळ्या ठिकाणी उपस्थित राहू शकत नाही', अशी प्रतिक्रिया दिली. तसेच अजित पवारांना माझ्या राजीनाम्याची पूर्वकल्पना होती, असेही ते म्हणाले.
राजीनाम्यानंतर अजित पवार शांत होते : शरद पवारांनी 2 मे रोजी त्यांच्या आत्मचरित्राच्या उद्घाटन सोहळ्यादरम्यान अचानक अध्यक्षपदाच्या राजीनाम्याची घोषणा केली होती. त्यांच्या या निर्णयाने उपस्थित राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला होता. राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड, माजी मंत्री अनिल देशमुख, प्रफुल्ल पटेल इत्यादी नेत्यांनी त्यांच्या या निर्णयाचा जोरदार विरोध केला होता. या सर्वांनी शरद पवारांना राजीनामा मागे घेण्याची जाहीर विनवणी केली होती. मात्र या सर्व घटनाक्रमादरम्यान अजित पवार आणि सुप्रिया सुळे मात्र शांत होते. त्यांनी नेते व कार्यकर्त्यांना शांत राहून हा निर्णय स्वीकारण्याची अपील केली होती.