मुंबई -अमली पदार्थ तस्करी प्रकरणी अटक असलेला बॉलिवुड अभिनेता एजाज खानला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या कस्टडीत असलेल्या एजाज खानची चौकशी सुरू असताना त्याला कोरोनाची लक्षणे आढळली होती. त्यामुळे त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती. त्याचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
एनसीबीच्या कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी -
एजाज खानच्या संपर्कात आलेल्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे कर्मचारी व अधिकाऱ्यांची सुद्धा कोरोना चाचणी केली जाणार आहे. मुंबईतील अमली पदार्थ तस्कर शादाब बटाटा व शाहरुख खान या दोन अमलीपदार्थ तस्करांना नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने अटक केल्यानंतर अभिनेता एजाज खानचे नाव समोर आले होते. त्यानंतर जयपूरहून मुंबई विमानतळावर दाखल झालेल्या एजाज खानला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने ताब्यात घेतले होते. त्याची आठ तास चौकशी करण्यात आली होती. एजाज खानला सोबत घेऊन नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने मुंबईतील अंधेरी, लोखंडवाला परिसरामध्ये छापेमारी केली होती.
दरम्यान, आतापर्यंत एजाज खानच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीवरून बॉलीवूड, टेलिव्हिजन क्षेत्रात अमली पदार्थ पुरवण्याचे काम खान करत होता. त्यामुळे लवकरच नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो बॉलिवूड व टेलिव्हिजन क्षेत्रातील काही व्यक्तींना चौकशीसाठी समन्स बजावणार आहे.