मुंबई -शहरातील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज इंडिगोच्या विमानाला अपघात झाला. आज सकाळच्या सुमारास सुटलेल्या वाऱ्यामुळे विमानतळावरील स्पाईसजेटची एक शिडी इंडिगोच्या विमानाच्या पात्याला धडकली. यामध्ये शिडीचे आणि विमानाच्या पात्याचेही मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे.
मुंबई विमानतळावर C-87 या पार्किंगमध्ये स्पाईस जेटच्या विमानाची प्रवासी शिडी ठेवण्यात आली होती. या शिडीच्या बाजूलाच स्पाईस जेटचे VT-SLA आणि इंडिगोचे 320 हे विमानही पार्क करण्यात आले होते. मात्र, सकाळी सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात झाल्यानंतर स्पाईस जेटची शिडी अचानक इंडिगोच्या विमानाला धडकली.
या अपघातात इंडिगो विमानाच्या उजव्या पंखाचे नुकसान झाले. सुदैवाने ही दोन्ही विमाने तात्काळ सेवेत नव्हती, असे स्पाईसजेटच्या वतीने सांगण्यात आले आहे. तसेच मुंबईला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला होता. मात्र, सोसाट्याचे वारेही वाहतील, असा अंदाज वर्तवण्यात आले नव्हता. स्पाईस जेटची शिडी नेहमीप्रमाणे आपल्या सुरक्षित जागेवर ठेवण्यात आली होती असेही सांगण्यात आले आहे
मुंबईत शुक्रवारच्या (दि. 5 जून) विश्रांतीनंतर सकाळी साडेसहाच्या सुमारास मुसळधार पावसाला सुरुवात झाली. यावेळी सोसाट्याचा वाराही सुटला आहे. वाऱ्यामुळे स्पाईसजेट कंपनीची शिडी इंडिगो विमानाच्या इंजिनक्लाउडींग आणि पंखाला धडकली. दरम्यान, आज पहाटेपासून मुंबईसह ठाणे, भिवंडी याठिकाणी मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे सखल भागात मोठे पाणी साचले होते.
हेही वाचा -भाजप नेत्याकडून शिवाजी महाराजांच्या इतिहासाची मोडतोड केल्याचा आरोप, 'आप'ची पोलिसांत तक्रार