मुंबई- देशासाठी विविध भागात वीरगती प्राप्त झालेल्या तब्बल दीड हजारांहून अधिक वीर जवानांना त्यांच्या गावी जाऊन सलामी देण्याचा एक नवा संकल्प उत्तर प्रदेशातील आग्रा जवळच्या खंडोली गावातील देव पराशर या पाचवीतील चिमुकल्याने केला आहे. देशातील वीर जवानांना सलामी देण्यासाठी जाताने तो खास सैनिकांचा वेश परिधान करतो.
देव पराशर हा इयत्ता पाचवीत शिक्षण घेतो. त्याला मोठे होऊन सैन्यात वैद्यकीय सेवा करायची आहे. एक दिवशी तो टीव्ही पाहत असताना कॅलिफोर्नियाची एक बातमी पाहिली त्यामध्ये एक मुलगा वीर जवानांच्या घरी जाऊन त्यांच्या घरावर राष्ट्रध्वज लावून सलामी देत होता. ते पाहिल्यानंतर त्याने त्याच्या वडीलांशी बोलून हा अनोखा संकल्प केला. तो त्याचे वडील सतीश पराशरसोबत देशासाठी स्वातंत्र्यासाठी रोज सीमेवर वीरगती पत्करणाऱ्या आणि मुंबईतील 26/11 च्या हल्ल्यातील वीरजवानांना त्यांच्या गावी जाऊन सलामी देण्याचे एक अनोखे कार्य करत आहे. वीर जवानांच्या घरी प्रत्यक्ष जाऊन तिरंगा ध्वजासह कुटुंबीयांना सलामी देतो. नुकतेच त्यांनी मुंबईतील 26/11 मधील वीर तुकाराम ओंबळे यांच्या घरी जाऊन कुटुंबीयांची भेट घेतली आणि आपली अनोखी सलामी देत आपला प्रवास सुरू ठेवला आहे. आत्तापर्यंत 1 हजार 565 वीर जवानांना देव आणि त्याच्या वडिलांनी त्यांच्या गावी जाऊन सलामी दिली असून यात राजस्थान, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील अनेक गावांचा समावेश आहे.