मुंबई : जुनी पेन्शन योजना लागू करा या मागणीसाठी राज्यभरातील १८ लाख कर्मचारी आजपासून संपावर गेले होते. त्या संपाला मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी पाठिंबा दिला आहे. पालिका ही स्वायत्त संस्था असल्याने आपले निर्णय ती स्वता घेऊ शकते. मात्र पालिका आयुक्त याबाबत सकारात्मक नसल्याने मुंबई पालिका ठप्प होईल असा आपला लढा आणखी तीव्र करावा लागेल असा इशारा मुंबई महानगरपालिका कामगार कर्मचारी संघटना समन्वय समितीने दिला आहे.
'या' मागण्यांसाठी आंदोलन :राज्यभरातील संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी आज मुंबई महानगरपालिका कामगार कर्मचारी संघटना समन्वय समितीने मुंबईच्या आझाद मैदानात धरणे आंदोलन केले. यावेळी समन्वय समितीने पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांची भेट घेतली. बैठकी दरम्यान २००८/ पासून सुरु केलेली नवीन पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करावी. सर्व संवर्गातील रिक्त पदे त्वरित भरण्यात यावी. कंत्राटी कामगारांना मुंबई महानगरपालिकेच्या सेवेत सामावून घ्यावे. या मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या बैठकीनंतर समन्वय समितीच्या अशोक जाधव, बाबा कदम, प्रकाश देवदास आदी पदाधिकाऱ्यांनी आझाद मैदानात कामगारांना संबोधन केले.
आंदोलन आणखी तीव्र करणार :यावेळी बोलताना, पालिकेच्या एक लाख कर्मचाऱ्यांपैकी ८० हजार कर्मचारी समन्वय समितीसोबत आहेत. जुनी पेन्शन योजना कर्मचाऱ्यांना लागू करावीच लागेल. आज आम्ही आयुक्तांची भेट घेतली. या भेटीत आयुक्तांनी समिती नेमून राज्य सरकारला तुमच्या मागण्या कळवू असे आश्व्सन दिले आहे. मात्र मुंबई महापालिका स्थानिक स्वराज्य संस्था आहे. त्यामुळे पालिका आयुक्त निर्णय घेऊ शकतात. मात्र त्यांना हा निर्णय घ्यायचा नसल्याने आजपासून सुरु झालेले आंदोलन आणखी तीव्र करावे लागेल असा इशारा समन्वय समितीचे निमंत्रक प्रकाश देवदास यांनी दिला आहे. यावेळी संपूर्ण मुंबई महापालिका ठप्प होईल अशी तयारी कारवी लागेल असेही देवदास म्हणाले.